पणजी - अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जाहीरपणे विद्रोह केलेले गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांना राजकारणात रस वगैरे आहे म्हणून नव्हे तर सामाजिक गरज म्हणून घेतल्याचे लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
संघचालक म्हणून पदावरून कमी केल्यामुळे तुम्ही राजकारणात उतरत आहात काय, तसेच एक या निर्णयामागे एक प्रकारचा राग किंवा सूड भावना असू शकेल काय असे विचारले असता. त्यांनी पदाची व सत्तेची हाव असती तर पदही सोडले नसते व आंदोलनही छेडले नसते असे सांगितले. ज्या सामाजिक तत्त्वांना अनुसरून त्यांनी संघाचे काम केले त्याच तत्त्वांसाठी पदांवरही पाणी सोडल्याचे ते सांगतात. मुद्दा होता प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे हा जागतिक सिद्धांत भाजपाविरोधात असताना बरोबर आणि सत्तेवर असताना चुकीचा असे कसे शक्य आहे. सर्व पर्याय वापरून शेवटी नाईलाजाने पक्ष स्थापन करून राजकारणात उतरावे लागत असल्याचे ते म्हणाले.
आज या युगात पैशांच्या गुंतवणुकीशिवाय राजकारण्याच्या तुम्ही गोष्टी करतात. त्या कितपत शक्य आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले ' राजकारण करून जिंकून येण्यास राजकारण म्हणजे धंदा नाही. दुर्दैवाने आज राजकारणाला धंद्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. परंतु प्रामाणिक तत्वनीष्ठ राजकारणाला लोक प्राधान्य देतात हे सिद्ध करण्यासाठी त्या ताकदीच्या तत्वनीष्ठ प्रामाणिक राजकारणी लोकांची गरज आहे. गोवा सुरक्षा मंच नेमके हेच राजकारण करण्यासाठी स्थापन झाला आहे"
सक्रीय राजकारणात म्हणजे तुम्ही संघटनात्मक कामे करणार की निवडणूकही लढविणार असे विचारले असता त्यांनी काळानुरूप आणि गरजेनुरूप जे काही क रावे लागेल ते केले जाईल. कारण शेवटी उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. आताच 'न धरी शस्त्र करी घोषणा करून मर्यादा घालून घेण्याची गरज मला वाटत नाही अहे त्यांनी सांगितले. केवळ माध्यम या विषयावर निवडणुका लढविणे शक्य आहे काय या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्यांनी राजकारणात उतरल्यानंतर म्हादई कॅसिनो, बेरोजगारी हे विषय पक्षाने हाती घेतले आहेत. लोकांच्या हिताचे जे जे मुद्दे असतील ते सर्व पक्षातर्फे घेतले जातील असे त्यांनी सांगितले.