- राजू नायक
सुरेश आमोणकर यांच्याबद्दल ऐकून होतो, वाचले होते. परंतु त्यांना पहिल्यांदा भेटलो, 1999 मध्ये गोवा विद्यापीठात कोकणी विश्वकोषाच्या कार्यक्रमानंतर एका पार्टीत. तेथे त्यांनी त्यांच्या पत्नी सुधा आमोणकर यांच्याबरोबर लोकगीते म्हटली आणि वातावरण आनंदमयी करून टाकले. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा ते वातावरण उत्साहित करून टाकत, समोरच्या माणसाला प्रफुल्लित करीत, शिवाय स्वत:चा जबरदस्त प्रभावही पाडीत.
सुरेश आमोणकर (१९३५-८ डिसेंबर २०१९) म्हणजे गोव्याचे एक प्रमुख शिक्षणतज्ज्ञ. गोवा मुक्तीनंतर (१९६१) गोव्याला विधायक वळण देण्यात ज्या काही मोजक्या लोकांनी अतुलनीय कामगिरी बजावली, त्या पहिल्या पिढीचे ते शिलेदार. त्यांनी न्यू गोवा शिक्षण संस्थेचे (म्हापसा) प्राचार्यपद सांभाळले, शिक्षक पुरस्कार मिळविले, गोवा शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्षपद भूषविले, राज्य शिक्षण साक्षरता मोहिमेचे ते प्रमुख होते. या कामासाठी २००९ मध्ये त्यांना पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले. परंतु ते ख-या अर्थाने नावाजले गेले ते त्यांनी सर्व प्रमुख धर्मग्रंथ कोंकणीमध्ये भाषांतरित केले त्यामुळे. धम्मपद, तिरूकुरल, भगवद्गीता, ख्रिस्तपुराण, ज्ञानेश्वरी, झेनकथा त्यांनी कोंकणीत आणली. धम्मपदासाठी ते पालीभाषा शिकले व त्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार मिळाला. ज्ञानेश्वरीसाठी त्यांचा पुण्यात गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला.
भाषांतराचे काम हे मूळ संहिता रचण्यापेक्षाही अवघड काम असते. त्यासाठी लागते अभ्यासू वृत्ती, मेहनत, जिद्द आणि चिकाटी. याच काळात त्यांना कर्करोगाशी झुंजावे लागले. गेल्या १० वर्षात तीन वेळा. त्यांच्याबरोबर सतत राहणारी सहचारिणी- सुधा आमोणकर - पतीच्या पहिल्या आजारात शुश्रूषा करताना अचानक छोटय़ा आजाराचे निमत्त होऊन वारल्या. परंतु सुरेशबाब यांनी त्या दु:खावरही मात केली आणि या साहित्य रचनेच्या कार्यात स्वत:ला एवढे झोकून दिले की क्षणाची उसंत घेतली नाही. त्यांनी वर्षभरापूर्वी ‘ज्युलियस सिझर’ हे नाटक भाषांतरित केले, शिवाय नुकतेच संत रामदासांचे ‘मनाचे श्लोक’ कोंकणीत आणले आहेत. या अनेक कलाकृतींचा मी स्वत: एक जवळचा प्रेक्षक राहिलो.
मंगळूर-गोवा एका रेल्वे प्रवासात त्यांनी मला ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्या ऐकविल्या होत्या. त्यानंतर दर १५ दिवसांनी आम्ही भेटत असू, तेव्हा झपाटल्यागत ते आपल्या भाषांतर प्रक्रियेबद्दल बोलत. ८३ वर्षे वयाचा माणूस, ज्याचा कर्करोग सतत पाठलाग करतोय आणि सर्जनशील निर्मिती प्रक्रिया अखंडितपणो चालवितो आहे, थकत नाही, उलट नवनवी आव्हाने खांद्यावर घेतोय हा प्रकार आम्हा सर्वानाच- जे आमोणकरांना निकट होते, चकित करणारा आणि स्फूर्ती देणारा होता.
गेले वर्षभर जेव्हा त्यांना तिस-यांदा कर्करोग डसला, तेव्हा ते किंचित त्रासलेले होते. नियमित औषधे घेणारे, केमोथेरपीला सहज स्वीकारणारे आमोणकर त्रसले होते; कारण डॉक्टरांना यावेळी निदान लवकर करता आले नाही. त्यांना रेडिओथेरपीला सामोरे जावे लागले. दंडाला जेथे गाठ आली ती त्यांना वेदनादायी वाटत असे. परंतु या काळातही त्यांची राहणी बदलली नाही, दिनक्रम बदलला नाही की आनंदी राहण्याचा स्वभावही बदलला नाही. ते म्हणायचे, कर्करोगाशी झुंजायचे तर सकारात्मक राहायला हवे. मी कार्यालयीन काम संपवून रात्री त्यांना भेटायला गेलो तर ते उशिरापर्यंत नवनवे सुनावत राहात. पुणे -मुंबईहून त्यांना नवनवी पुस्तके येत. ती देत. त्यांच्यावर चर्चा करीत.
अनेकदा आमच्याबरोबर बाहेर जेवायला जात. दोन वर्षापूर्वी आम्ही आंबोलीलाही जाऊन आलो. त्यांचे टापटीपीचे राहणे, सुंदर फ्रेंचकट दाढी, रंगीत सदरे, याखाली पांढरी सलवार, खांद्यावर उपरणे हे अनेकांना मोहित करीत आले. ते अभिमानाने म्हणत, लेखनाचा वारसा त्यांना बाकीबाब बोरकरांकडून मिळाला. ते त्यांचे मामा. तसेच बाकीबाबांची वेशभूषाही त्यांनी घेतली असावी. बाकीबाबांचा शानशोकीपणा चर्चेचा विषय असे. पोर्तुगीज शिक्षण घेतलेले, येथील राहणी, शिवाय विदेशात भ्रमण यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला. तो सकारात्मकरीत्या त्यांनी अनेक ठिकाणी उपयोगात आणला. विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी बोलता आली पाहिजे. मनोहर पर्रीकर जे त्यांचे विद्यार्थी- इंग्रजीवरचा प्रभाव ही आमोणकरांची त्यांना देणगी. पर्रीकरांनी तसे जाहीरपणे सांगितले आहे. रमाकांत खलप हे सुद्धा त्यांचे विद्यार्थी. खलपही त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात.
आमोणकरांच्या अंत्यसंस्काराला लोक मोठय़ा संख्येने आले. वृद्ध वर्ग आलाच; परंतु तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात आलेला दिसला. या महान गुरूचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी हा वर्ग मोठ्या संख्येने लोटला होता. सरांनी आपले शरीर वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले. त्यावेळी सरांना आवडणा-या प्रार्थना म्हणण्यात आल्या. एक योद्धा ‘तरुण’ मित्र गमावल्याचे दु:ख घेऊन मी म्हापशाहून परतलो. शेवटपर्यंत एक खंत घेऊन. त्यांचे रंगतदार जीवन आत्मवृत्ताच्या स्वरूपात मी त्यांच्याकडून लिहून घेऊ शकलो नाही. मी त्यांना अनेकदा विनंती केली होती. आता तुमचे आत्मचरित्र यायला हवे. ते म्हणत, ते सच्चे असायला हवे. त्यात लपवाछपवी चालणार नाही. तुम्ही सच्चेच लिहिणार, मी त्यांना सांगत असे. परंतु का कोण जाणे, त्यांनी आत्मचरित्र लिहिण्याचे टाळलेच!