पणजी : गोव्यातील एकमेव महापालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली. रोहित यांनी महापौरपदाचा कार्यभार हाती घेतला. रोहित हे पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र आहेत. (Goa: Panaji's new mayor Rohit Monserrate; Vasant Agashikar as Deputy Mayor)
नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत बाबुश अर्थात भाजपा पॅनलला ३0 पैकी २५ जागा मिळाल्या होत्या. नव्या महापौर, उपमहापौरांनी तसेच नगरसेवकांनी आज सकाळी शपथ घेतली. आगशीकर हे दुसऱ्यांदा उपपमहापौर बनले आहेत. महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात तसेच सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. दोघांनीही महापौर-उपमहापौर तसेच नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या.
रोहित यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. दुपारीच त्यांनी महापौर दालनाचा ताबाही घेतला.
महापालिकेत १३ महिला निवडून आल्या तरीही भाजपाने उपमहापौरपद डावलले, काँग्रेसची टीकादरम्यान, महापालिका उपमहापौरपदीही महिलांना डावलल्याबद्दल काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा बीना नाईक यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजप महिलांचा आदर करत नाही, हे यातून स्पष्ट होते असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की,‘एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या संकल्पनेची बढाई मारत आहेत, तर दुसरीकडे भाजपने पणजी महापालिकेचे उपमहापौरपदही पुरुषाला देऊन महिलांना वंचित केले आहे.
महापालिकेवर जवळपास १३ महिला निवडून आल्या असून त्यापैकी काहीजणींनी नगरसेवक म्हणून याआधी काम के लेले आहे. असे असतानाही त्यांना डावलण्यात आले. भाजपच्या महिला नगरसेविका या अन्यायाबद्दल काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटते, असे नाईक म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, ‘महिलांनी पुढे येऊन पदे भूषवावीत अशी भाजपची इच्छा नाही. कॉंग्रेसमध्ये असा भेदभाव कधीच आणि तो होणारही नाही. बलात्काराच्या आरोपींवर भाजप कारवाई करत नाही, परंतु त्यांचे उदात्तीकरण करतो, अशी टीकाही त्यांनी केली.