- पूजा प्रभूगावकरपणजी- जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी रस्त्यांच्या हॉट मिक्सिंगचे काम हाती घेतल्याने पणजी ते बांबोळी, पणजी ते पर्वरी या दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांना, तसेच परीक्षेसाठी केंद्रावर जाणाऱ्या इयत्ता दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक, रुग्णवाहिन्याही या कोंडीत अडकले. यामुळे सरकारची नियोजन शून्यता पुन्हा एकदा उघड झाली. पणजीत चक्काजामची स्थिती निर्माण झाली.
संंतप्त बसलेल्या वाहनचालकांनी सरकारविरोधात प्रचंड राेष व्यक्त केला. स्थिती हाताळण्यास जमत नसेल तर कामे करतात तरी कशाला, असा संताप यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. जवळपास एक ते दीड तास ही वाहतूककाेंडीत वाहने अडकून पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी वाहतूक पोलिसांनाही स्थितीत हाताळता आली नाही.
पणजीतील वाहतूक कोंडीची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर गोवा मामू हागे , वाहतूक पोलिस उपधीक्षक सिध्दांत शिरोडकर, पोलिस निरीक्षक तसेच सार्वनजिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन आढावा घेतला. यावेळी रस्त्याची एक लेन खुली केल्याने काही प्रमाणात कोंडी सुटण्यास मदत झाली. यावेळी रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम करु नये तसेच मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम खात्याला दिले आहेत.