कुठं गाऱ्हाणी, तर कुठं नोकऱ्यांची आमिषं; गोव्यात पंचायत मंडळं घडविण्यासाठी घोडेबाजाराला ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:08 PM2022-08-18T14:08:51+5:302022-08-18T14:16:14+5:30

भाजप सक्रीय, काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टाकली नांगी

goa panchayat elections bjp is more aggressive congress and other parties less active | कुठं गाऱ्हाणी, तर कुठं नोकऱ्यांची आमिषं; गोव्यात पंचायत मंडळं घडविण्यासाठी घोडेबाजाराला ऊत

कुठं गाऱ्हाणी, तर कुठं नोकऱ्यांची आमिषं; गोव्यात पंचायत मंडळं घडविण्यासाठी घोडेबाजाराला ऊत

googlenewsNext

किशोर कुबल

पणजी : गोव्यात सरपंच, उपसरपंच निवड येत्या सोमवारी २२ रोजी होत असून पंचायत मंडळे घडविण्यासाठी भाजपच अधिक सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. आरजी वगळता प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या कोणत्याही हालचाली दिसत नसून त्यांनी नांगी टाकल्यासारखीच स्थिती आहे.

भाजपने अधिकाधिक पंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी १८६ पैकी किमान १४0 पंचायतींवर भाजपची पंचायत मंडळे असतील, असा दावा केला आहे. अनेक पंचायतींमध्ये भाजपने सरपंच, उपसरपंचही निश्चित केले आहेत.

भाजपचे काही माजी आमदार तसेच नेते सक्रीय आहेत. मांद्रे मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत दयानंद सोपटे यांचा पराभव झाला. मात्र पंचायत मंडळे घडविण्यासाठी ते सक्रीय आहेत. सांत आंद्रेतील पंचायतींमध्ये माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा सक्रीय आहेत. आगशी (सेंट लॉरेन्स) पंचायतीत सिल्वेरांचा बंधू बेनी व पुतण्या अ‍ॅलन निवडून आलेले आहे. अ‍ॅलन यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. या पंचायतीत सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे उपसरपंचपद वरील दोघांपैकी एकाला मिळू शकते. या अकरा सदस्यीय पंचायतीत आरजीचे केवळ चार उमेदवार निवडून आले आहेत.

स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, बांधकाममंत्री निलेश काब्राल, मडकईत वीजमंत्री सुदिन ढवळीकर पंचायत मंडळे घडविण्यासाठी सक्रीय आहेत. साळगांवमध्ये माजी आमदार तथा भाजप नेते जयेश साळगांवकर हेही पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही ठिकाणी पंच सदस्यांना नोकऱ्यांची आमिषे दाखवली जात आहेत. परंतु काही पंचायतींमध्ये पंच सदस्य न फुटण्यावर ठाम आहेत. आमिषे धुडकावली जात आहेत. सांत आंद्रे मतदारसंघात आजोशी मंडूर पंचायत आरजीकडे आलेली आहे. तेथे सरपंचपदी प्रशांत नाईक व उपसरपंचपदी तेजस्वी नाईक यांची नावे निश्चित झालेली आहेत. भाटी व शिरदोण पंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी आरजी प्रयत्नरत असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

रुमडामळमधील अपक्ष एकसंध
दरम्यान, दक्षिण गोव्यात ९ सदस्यीय रुमडामळ पंचायतीत सत्ता स्थापण्यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. मात्र तेथे पाच अपक्ष पंच सदस्यांचा गट एकसंध असून उर्फान पठाण, समिउल्ला फानिबांद, मुस्तफा दोडामणी, मुबीना फानिबांद व झुबेदा आगासी हे पाचही पंच सदस्यांनी आपण एकत्र आहोत आणि भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, असे सांगण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. मुबीना यांना सरपंचपद देण्याचेही या गटाने ठरविले असून मुस्तफा दोडामणी उपसरपंच असतील. पहिल्या अडीच वर्षांसाठी या गटामध्ये वरीलप्रमाणे समझोता झालेला आहे.

देवस्थानांमध्ये गाऱ्हाणी!
काही जणांनी पंचांनी फुटू नयेत म्हणून देवस्थानांमध्ये गाऱ्हाणी घातली आहेत. तर काही जणांनी फुटणार नाही म्हणून आणा-भाकाही घेतलेल्या आहेत. कोणत्याही आमिषांना बळी पडणार नाही, असे पंच सदस्यांनी कबूल केले आहे. आम्ही निवडून आलो त्याच पॅनलमध्ये राहणार, अन्यत्र कुठेही जाणार नाही, अशा शपथा पंचांनी घेतलेल्या आहेत.

राजकारण्यांचे नातलग बनणार सरपंच!
पीर्ण पंचायतीत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे बंधू संदीप यांचे सरपंचपद निश्चित झाल्याची माहिती मिळते. मोरजी पंचायतीत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा भाचा सरपंचपदासाठी शर्यतीत आहे. तेंडुलकर यांनी आपल्या भाच्यासाठी वजन वापरले आहे. सांत आंद्रेतील आगशी (सेंट लॉरेन्स) पंचायतीत माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे बंधू बेनी यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. या पंचायतीत सरपंचपद महिलांकरिता राखीव आहे.

Web Title: goa panchayat elections bjp is more aggressive congress and other parties less active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.