- समीर नाईक
पणजी - ताळगावमध्ये पंचायत घर ही काळाची गरज आहे. गेल्या पंच कमिटीने पंचायत घरसाठी जे प्रयत्न केले आहे, ते प्रयत्न आम्ही यावेळी पुढे नेणार आहोत. तसेच इतर जी कामे अपूर्ण राहिली आहेत ती कामे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ताळगावच्या नव्या सरपंच मारिया फर्नांडिस यांनी दिली.
ताळगाव पंचायत क्षेत्राचा मंत्री बाबुश मोन्सेरात आणि ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी खूप विकास झाला आहे. त्यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे आम्हाला काम करणे सोपे होईल. सध्या आम्ही प्रामुख्याने मॉन्सूनपूर्व कामे करण्यावर भर देणार आहोत, असे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.
ताळगावमध्ये कचरा विल्हेवाट योग्य प्रकारे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त लोकांपर्यंत सरकारी कामे पोहचविण्याकडे आमचा जास्त भर असणार आहे. तसेच पंचायतच्या कामात पारदर्शकता ठेवणे हेही आमचे उद्देश आहे. ताळगाव पंचायत आदर्श पंचायत कशी करता येईल यावरही विचार होणार आहे, असे नवे उपसरपंच सागर बांदेकर यांनी यावेळी सांगितले.