मागच्या सहा दिवसात 7 विदेशी नागरिकांना अटक : तीन महिन्यात एकूण 9 जण अटकेत
सुशांत कुंकळयेकर
मडगाव : मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेला गोवा विदेशी नागरिकांसाठी बेकायदा वास्तवाचेही प्रमुख ठिकाणी बनले असून मागच्या सहा दिवसात एकूण सात विदेशी नागरिकांना बेकायदा वास्तवाबद्दल अटक केल्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2018 साली गोव्यात बेकायदा वास्तव करुन असलेल्या 20 विदेशी नागरिकांना अटक केली होती. मात्र, यंदा पहिल्या तीन महिन्यांतच एकूण 9 विदेशी नागरिकांना कुठलीही कागदपत्रे न बाळगता गोव्यात राहिल्याबद्दल अटक झाली आहे.
सोमवारी अंजुणा पोलिसांनी त्यांच्या पोलीस स्थानकाच्या कक्षेत बेकायदा वास्तव करुन राहिलेल्या दोन तांझानियन महिलांना अटक केली होती. त्यापूर्वी 19 व 22 मार्च रोजी कळंगूट पोलिसांनी तांझानियाच्या दोन तर युगांडाच्या दोन महिलांना अशाचप्रकारे अटक केली होती. त्यादरम्यान मडगावच्या कोंकण रेल्वे पोलिसांनीही 23 मार्च रोजी सिंडेनी ऑलेक्झांडर या युक्रेनच्या नागरिकाला अटक केली होती. या सातही प्रकरणात सर्व संशयित केवळ योगायोगाने पोलिसांच्या तावडीत सापडले होते. अंजुणा येथे अटक केलेल्या तांझानियन महिला एकमेकांशी भांडत असताना त्यांना पोलिसांनी पकडल्याने त्यांचे बेकायदेशीर वास्तव उघडकीस आले होते. तर कळंगूट येथे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरुन चार महिलांना ताब्यात घेतल्यावर कुठलीही वैध कागदपत्रे नसताना त्यांचा कळंगूट भागात वावर होता हे स्पष्ट झाले होते. मडगावच्या कोंकण रेल्वे पोलिसांच्या हाती लागलेला युक्रेनियन असाच रेल्वेने प्रवास करताना पोलिसांच्या हाती लागला. वास्तविक त्याचे वास्तव कर्नाटकातील गोकर्ण येथे होते अशीही माहिती हाती लागली आहे.
यासंबंधी एका पोलीस अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले की, गोव्यात असंख्य विदेशी पर्यटक येत असतात त्यांच्याबरोबर कित्येकदा गुन्हेगारही येत असतात. ड्रग्स, वेश्या व्यवसाय अशा वेगवेगळ्या अवैध धंद्यात त्यांचा वावर असतो. कायदेशीर कागदपत्रे घेऊन गोव्यात वास्तव केले तर आपले काळे धंदे उघडकीस येतील याची जाणीव असल्यामुळेच हे गुन्हेगार बेकायदेशीरित्या गोव्यात वास्तव करुन रहातात. आपली माहिती कुणाला मिळू नये यासाठी जो घरमालक पोलिसांना आपल्या वास्तवाची माहिती देत नाही त्याच ठिकाणी ते रहातात. याबदल्यात घरमालकांना ते घसघशीत घरभाडेही देतात.
अंजुणा येथे अटक केलेल्या दोन महिलांना वास्तव देणा:या घरमालकाने पोलिसांना त्यांच्या राबित्याची कुठलीही माहिती दिली नव्हती हीही गोष्ट आता उघडकीस आली आहे. दोन्ही महिला या घर मालकाला दरमहा प्रत्येकी 8 हजार घरभाडे देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी अंजुणा पोलिसांनी घरफोडय़ात सामील असलेल्या चार जॉर्जियन नागरिकांना अटक केली होती. या नागरिकांनाही आसरा देणा:या घरमालकाने त्यांची कुठलीही माहिती पोलिसांना दिली नव्हती, अशी माहिती अंजुणाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. या दोन्ही प्रकरणात आता घर मालकांवरही गुन्हा नोंद केल्याचे देसाई यांनी सांगितले.
आतापर्यत पहिल्या तीन महिन्यात ज्या 9 विदेशी नागरिकांना बेकायदा वास्तवासाठी अटक करण्यात आली आहे त्यापैकी चार नागरीक तांझानियन असून दोन युगांडाचे तर केनिया, नायजेरिया व युक्रेन या देशातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. गोव्यात बेकायदा वास्तव करुन रहाणा:या नागरिकांमध्ये आफ्रिकन आणि रशियन देशाच्या नागरिकांचाच अधिक समावेश असतो हेही या घटनांतून उघड झाले आहे.गोव्यात बेकायदा वास्तव करुन रहाणाऱ्या बहुतेक आफ्रिकी देशातील नागरिकांचा अंमलीपदार्थ व्यवहारात हात असतो अशीही माहिती पोलिसांकडून मिळाली. 30 जानेवारी रोजी कोळंब व काणकोण या किनारपट्टी भागात अटक केलेल्या जोजफ अचोला ओवमा या 50 वर्षीय केनियन नागरिकांकडे तब्बल सव्वादोन लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. 2011 पासून हा संशयित गोव्यात बेकायदा वास्तव करुन रहात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापूर्वी 4 जानेवारी रोजी उत्तर गोव्यातील पर्रा या भागात अस्तिफोर ओनियुग्वो या 29 वर्षीय नायजेरियनाला असाच बेकायदा वास्तवासाठी अटक करण्यात आली होती. गोव्यात असे बेकायदेशीर वास्तव करुन रहाणारे शेकडो विदेशी नागरीक असून त्यांचा वावर मुख्यत: किनारपट्टी भागात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यापैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असे नागरीक पोलिसांना सापडले आहेत हेही तेवढेच सत्य आहे.
बलात्कार, ड्रग्स आणि घरफोड्याही
आतार्पयत गोव्यातील विदेशी नागरीक गोव्यात अंमली पदार्थाच्या व्यवसायातच दिसून येत होते. मात्र, मागच्या काही वर्षात हे विदेशी नागरीक घरफोडय़ा आणि चो:या सारख्या गुन्हय़ातही सामील असल्याचे दिसून आले आहे. 22 फेब्रुवारी रोजी कळंगूट पोलिसांनी पर्रा येथे चार रशियन नागरिकांना अटक करुन त्यांच्याकडून 6.79 लाखांचा अंमलीपदार्थ पकडला होता. हे आरोपी या भागातील एटीएम चोरीतही सामील असल्याची बाब पुढे आली होती. अंजुणा येथे पकडलेले जॉर्जियन नागरीक घरफोडय़ामध्ये सामील होते. यापूर्वी एटीएममध्ये स्किमर बसवून लोकांना लुटण्यामागे बल्गेरिया व रोमानियन नागरीकांचा हात असल्याचे दिसून आले होते. यंदा विदेशी नागरिकांच्या हातून जे गुन्हे घडले आहेत त्यात मजीद अङिाझी या 27 वर्षीय इराणी युवकाला हरमल येथे एका कोलकात्याच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याशिवाय एका रशियन नागरिकाला शिवोली या भागात पाच लाखाच्या अंमली पदार्थाबरोबर अटक करण्यात आली होती.