पणजी : कोरोनाचा एकही रुग्ण अजून गोव्यात सापडलेला नाही पण दोघा संशयितांवर सरकारच्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण शेजारील पुण्यापर्यंत पोहोचल्याने गोमंतकीयांमध्ये धास्ती वाढली आहे. मात्र शिगमोत्सवाचे आयोजन बंद झालेले नाही. सरकारने लोकांना खबरदारी घेण्याचे सल्ले दिले आहेत, पण रेल्वे स्थानके, बस स्थानके व अन्यत्र कोरोनाविरोधी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सरकार थोडे बेपर्वाच असल्याची गोमंतकीयांची भावना झालेली आहे.गोव्यातील सर्व शहरांमध्ये व ग्रामीण भागात सध्या शिगमोत्सव सुरू आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा कुणी संशयित रुग्ण सापडलेला नाही. ग्रामीण भागात शिगमोत्सवात भाग घेण्यासाठी विदेशी पर्यटकही जास्त जात नाहीत पण शहरांमध्ये सरकारी पाठिंब्याने शिगमोत्सवाच्या ज्या मिरवणुका होतात, त्यात विदेशी पर्यटकही भाग घेत असतात. दूरवर प्रवास करून आलेले विदेशी पर्यटक शिगमोत्सवावेळी गोमंतकीयांमध्ये मिसळतात. पर्यटन खाते लाखो रुपये शिगमोत्सवाच्या मिरवणुकांवर खर्च करते. यंदा प्रमुख शहरातील शिगमोत्सव बंद करायला हवा होता, असा सूर समाजाच्या जागृत घटकांमध्ये उमटत आहे. लोकांनी मोठय़ा संख्येने एकत्रिकरण टाळावे असे सल्ले सरकारचे आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे रोज गोमंतकीयांना देत आहेत पण सरकारच्या पर्यटन खात्याच्याच पाठिंब्याने शिगमोत्सवानिमित्त मोठे एकत्रिकरण होणार आहे व त्यात पर्यटकही भाग घेणार आहेत. काही शहरांत अगोदरच मिरवणुका सुरू झाल्या आहेत.गोव्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रियाही सुरू आहे. राज्यभर प्रचाराचे फड रंग आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्वच मंत्री त्यात सहभागी होत आहेत. भाजप, काँग्रेस, मगोपसह विविध पक्षांकडून छोटय़ा सभा घेतल्या जात आहेत. मतदान येत्या 22 रोजी होईल व त्यावेळी मतपत्रिकांचा वापर केला जाणार आहे. मतदान करण्यासाठी हजारो लोकांकडून स्टॅम्पचा वापर केला जाणार आहे. त्यावेळी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी नुकतीच सरकारवर टीका केली. रेल्वे स्थानके व बस स्थानकांवर कोरोनाविरोधी तपासणीची कोणतीच व्यवस्था सरकारने केली नसल्याचे डिमेलो म्हणाले. शाळा, महाविद्यालयांमध्ये हजारो विद्याथ्र्याचे एकत्रिकरण होत आहे पण आरोग्य खात्याने तिथे लक्षच दिलेले नाही, असे डिमेलो म्हणाले.दरम्यान, सरकारी कर्मचा:यांनी कार्यालयात मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि गोमंतकीयांनी गोव्याबाहेरचा व विदेशातील प्रवास सध्या टाळावा, असा सल्ला आरोग्य खात्याने दिला आहे.
Coronavirus : कोरोनाविषयी गोमंतकीयांना धास्ती, सरकार किंचित बेपर्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 1:47 PM