पणजी - ''शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याचे बाबतीत कोणतीही कसर राहू नये, यासाठी जलस्रोत खाते आणि कृषी खाते यांच्यात सातत्याने समन्वय राहील हे पाहू. त्याकरिता दक्षिण आणि उत्तर गोवा कृती दल स्थापन केले जाईल. शेतकऱ्यांना शेती बागायतीला पाणी मिळावे यासाठी सौर ऊर्जा उपकरणे खरेदीकरिता अर्थसहाय्याची योजना येत्या वर्षात अधिसूचित केली जाईल'', अशी घोषणा कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी केली. जलस्त्रोत खात्याच्या पोर्टलच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. सरदेसाई म्हणाले की शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी कृषी खाते आणि जलस्त्रोत खाते यांचा ताळमेळ हवा. शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचतच नाहीत. शेती बागायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी जलस्रोत खात्याचाही काही योजना आहेत. कृती दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचविल्या जातील तसेच अन्य माध्यमातून शेती व्यवसाय पुढे नेणे शक्य आहे. कंत्राटी शेती, समूह शेतीला प्रोत्साहन तसेच शेती बागायतीला पुरेसे पाणी देऊन शेती व्यवसाय भरभराटीला आणता येईल, असेही ते म्हणाले सरदेसाई म्हणाले की कृषी कार्ड इत्यादी प्रयोग गोव्यातच प्रथम सुरू झाले आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.
खात्यातील सेवा ऑनलाइन केल्यानंतर वशिलेबाजीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशासनात पारदर्शकता येईल. कमीत हस्तक्षेप असला तर योग्यरीत्या काम करता येते. तंत्रज्ञानाचा वापर करून अशा माध्यमातून अनेक गोष्टी सुलभ होतील. जलस्रोतमंत्री विनोद पालेकर म्हणाले म्हणाले की, खात्यात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन सेवा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने पोर्टल सुरू केले इ मोठी उपलब्धी आहे. आपल्याकडील तिन्ही खात्यांमध्ये ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असे पालेकर यांनी सांगितले. जलस्त्रोत खात्याच्या या पोर्टल मुळे राज्यातील विहिरींची, टॅंकरची नोंदणी करणे, जी 2002 चा भूजल नियमन कायद्याखाली आवश्यक आहे ती आता ऑनलाइन करता येईल. कंत्राटदारांची नोंदणी, जलस्रोत खात्याच्या विश्रामगृहांचे आरक्षण, कंत्राटदाराचे ई-पेमेंट आदी गोष्टी पोर्टलच्या माध्यमातून करता येतील. जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी म्हणाले कि, सांगे येथे दोन आणि धावशिरे येथे एक अशी तीन विश्रामगृह आहेत याविषयी आरक्षण पोर्टलच्या माध्यमातून करता येईल. तीन कंत्राटदारांना त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी प्रमाणपत्रे देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.