'पोलिस बनले भाजपचे प्रवक्ते': युरी आलेमाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2024 12:25 PM2024-11-18T12:25:57+5:302024-11-18T12:27:09+5:30
असे असतानाही या सर्वांचे राजकीय कनेक्शन नाही, या निष्कर्षापर्यंत पोलिस कसे पोहोचले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी नोकऱ्या विक्रीप्रकरणी राजकारण्यांना क्लीन चिट देऊन गोवापोलिसांनी ते भाजपचे प्रवक्ते असल्याचे दाखवून दिले असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. सरकारी नोकऱ्या विक्रीप्रकरणी अजूनही तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या आधारे गुन्हेसुद्धा नोंद होत आहेत. मग असे असतानाही या सर्वांचे राजकीय कनेक्शन नाही, या निष्कर्षापर्यंत पोलिस कसे पोहोचले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आलेमाव म्हणाले की, नोकऱ्या विक्री प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशातच पोलिसांच्या वतीने एका विधानाद्वारे या विषयाशी राजकीय कनेक्शन नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस गुन्हेगारांना कशाला संरक्षण देत आहेत? नोंद झालेल्या सर्व तक्रारींचा तपास पूर्ण झाला का? आरोपपत्र सादर झाले का? जर नसेल तर मग पोलिसांनी हा निष्कर्ष कसा काढला ? पोलिस भाजपचे अप्रत्यक्षपणे प्रवक्ते असल्याचे भासवत असल्याची टीका त्यांनी केली.
ऑडिओ क्लिपचा पुरावा, तरीही कनेक्शन कसे नाकारले?
सरकारी नोकऱ्या विक्रीप्रकरणी राजकारण्यांवर आरोप असतानाच गोवा पोलिसांनी, मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकारण्यांचा याच्याशी कसलाही संबंध नाही, असे पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. या अशाच एका प्रकरणात सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्या विरोधातही आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी पोलिसांत ऑडिओसह तक्रार सादर केली आहे. मग राजकीय कनेक्शन नाही, असे पोलिस कसे म्हणू शकतात, असा प्रश्नही विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.