पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. केनेथ सिल्व्हेरा असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. केनेथ सिल्व्हेरा हा गोव्यातील एक उद्योगपती आहे. 17 एप्रिलला केनेथ सिल्व्हेरानं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत फेसबुक पोस्ट लिहिली होती. 'आताच माहिती मिळाली आहे की पर्रीकर यांचे निधन झाले आहे', असे केनेथनं पोस्टमध्ये लिहिले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी केनेथला ताब्यात घेतले. दरम्यान, सिल्व्हेरा पर्रीकरांचे कडवे विरोधक मानले जातात. त्यांनी पर्रीकरांविरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली होती, ज्यात त्याचा दारूण पराभव झाला होता.
मनोहर पर्रीकरांवर अमेरिकेत उपचार
मनोहर पर्रीकर सध्या अमेरिकेमध्ये स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. पर्रीकर मे महिन्यात गोव्यात दाखल होणार आहेत. मात्र, डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच ते गोव्यात परतणार आहेत, असे भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.