पणजी: दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही. अशा चालकांना केवळ दंड ठोठावून व चालक परवाने निलंबित करून पोलीस थांबणार नाहीत, तर अशा व्यक्तीला कायमचेच गुन्हेगारांच्या यादीत टाकले जाणार आहे. त्यामुळे भविष्याच चारित्र्याचा दाखला मिळणार नाही व कधी पासपोर्टही बनविता येणार नाही. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याशी झालेल्या गप्पादरम्यान त्यांनी मद्यपी चालकांवर येत्या काळात केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती दिली.वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाही हे कसे काय असे मुक्तेश चंदर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, पासपोर्ट पोलीस खात्याकडून दिला जात नाही. त्यामुळे हे विधान मी थेट करू शकत नाही, परंतु अर्थ मात्र तसाच होत आहे. वाहतूक नियमभंगाचे खूप प्रकार आहेत. सर्वात मोठा गुन्हा तेव्हाच ठरतो, जेव्हा वाहन चालक शुद्धीत नसताना किंवा अर्ध्या शुद्धीत असताना वाहन चालवितो. कारण अशी माणसे कुणाला कधी कशी धडक देऊन मारून टाकतील काही सांगता येत नाही. त्यामुळे पोलीस अशा लोकांच्या बाबतीत कठोर वागतील. कायद्यानुसार त्याला शिक्षाही होईल. त्याची नोंदही ठेवली जाणार आहे. भविष्यात हा माणूस एखादा महत्त्वपूर्ण दाखला वगैरे मागायला अला त्यावेळी त्याला त्रास होईल. पासपोर्टसंबंधीच्या अर्जावरच कधी दोषी सिद्ध होवून न्यायालयात गेलाय काय असा प्रश्न असतो. त्यावर ही अशी माणसे काय लिहिणार? शिवाय अशा माणसाच्या बाबतीत पासपोर्टसाठी पोलीस अहवाल मागितला जाईल. त्यातही त्याच्या तुरुंगवासाचा उल्लेख असणार. म्हणजे त्याला पासपोर्ट कसा मिळणार?’ असा प्रश्न त्यांनी केला. अजूनही मोठ्या प्रमाणावर नशेत वाहने चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे ते सांगतात. पहिल्याच मोहिमेत पोलिसांना ३१५ जण मद्यपी चालक सापडले. ही मोहीम दोन दिवसांपूर्वी जाहीर करून सुरू केली होती. त्यानंतर जाहीर न करता अचानक रात्रीच्यावेळी हाती घेतलेल्या मोहिमेतही मोठ्या प्रमाणावर तसे चालक मिळाले. यापुढे आकस्मिकपणे मोहिमा हाती घेतल्या जातील. मद्यपी चालकांच्या विरोधात वारंवार कारवाई केली जाईल आणि ती ही आकस्मिकपणे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस कारवाईत ढिसाळपणा आहे असे म्हणता येणार नाही. मद्यपी चालकांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल. स्वत: पोलिसांनी तर या बाबतीत खूप सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले. नशेत असताना ड्रायव्हिंगवर लक्ष लागत नाही. उलट शुद्ध हरपल्यामुळे चालक अनेक चुका करून बसतो. त्यामुळे केव्हाही पोलीस आल्कोमिटर घेऊन रस्त्यावर राहू शकतात असे त्यांनी सांगितले.
गोव्यात मद्यपींचं बुरे दिन; कायमस्वरुपी गुन्हेगारांच्या यादीत नाव जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 9:46 PM