पणजी - माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विषयावरून भाजपामध्ये बंडाची भूमिका घेतली आहे. मगो पक्ष पार्सेकरांना प्रसंगी तिकीटही देऊ शकतो पण लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष निवडणूक लढवतील असे दिसते. याच पार्श्वभूमीवर मगोपचे नेते व पार्सेकर यांच्यात गुप्त बैठक झाल्याची अफवा सोमवारी (11 मार्च) रात्री पसरली. मात्र मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांच्या मते कोणतीही बैठक झाली नाही. पणजीत आपण रस्ता ओलांडत असताना तिथेच रस्त्यावर पार्सेकर हे आकस्मिकपणे आपल्याला भेटले. ढवळीकर यांचा हा दावा असला तरी, पार्सेकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
गोव्यात म्हापसा, मांद्रे व शिरोडा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा मगोप हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच मगो पक्षाचे अध्यक्ष ढवळीकर हे शिरोडा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या बाजूने भाजपाचे नेते पार्सेकर यांनी बंडाची भूमिका घेऊन भाजपासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. काँग्रेसमधून दयानंद सोपटे यांना भाजपाच्या काही नेत्यांनी भाजपामध्ये आणले व आता मांद्रे मतदारसंघात भाजपातर्फे सोपटे हे पोटनिवडणूक लढवणार आहेत. पार्सेकर यांना हे मान्य नाही. आपल्याला पूर्ण गाफील ठेवून सोपटे यांना भाजपामध्ये आणले असे पार्सेकर यांचे म्हणणे आहे. पार्सेकर यांनी मांद्रेतील भाजपाच्या सर्व मूळ कार्यकर्त्यांना संघटीत करून नुकतीच एक सभाही घेतली. ते सोपटे यांच्या विरोधात आहेत व त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यावरही सातत्याने टीका केली आहे. पार्सेकर यांनी मगो पक्षाचे तिकीट मागितले तर प्रसंगी मगो पक्ष त्यांना तिकीटही देईल पण पार्सेकर हे अपक्षच लढण्याच्या स्थितीत आहेत.
दिपक ढवळीकर हे पणजीत एका दुकानवर गेले होते. तिथून आपण परतत असताना अचानक आपली भेट पार्सेकर यांच्याशी झाली. रस्त्याच्या बाजूलाच ही भेट झाली. ती काही राजकीय बैठक नव्हे, असा दावा दिपक ढवळीकर यांच्याकडून करण्यात आला आहे.