काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:33 PM2019-05-10T12:33:37+5:302019-05-10T12:34:32+5:30
गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे
पणजी : गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे. गोवा सरकारकडे सध्या काठावरचे बहुमत आहे. चार मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल कसा लागेल यावर गोवा सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. जर केंद्रात सत्ताबदल झाला किंवा गोव्यातील पोटनिवडणुकीत चारपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या तर गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार धोक्यात येऊ शकते याची कल्पना भाजपसह अन्य पक्षीय मंत्री, आमदारांनाही आली आहे. सध्या काठावरील बहुमत घेऊन सावंत सरकारने स्थिर राहण्याची कसरत चालवली आहे.
गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारचे संख्याबळ सध्या वीस आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत एकवीस आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. वीसपैकी भाजपकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार आहेत. तीन अपक्ष आहेत व त्या तिघांपैकी प्रसाद गावकर हे अपक्ष आमदार नावापुरतेच सरकारसोबत आहेत. केंद्रात सत्ताबदल झाला तर गोव्यात गावकर यांना बाजू बदलण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. गोवा फॉरवर्डचे तीन आमदार भाजपप्रणीत आघाडी सरकारचा भाग आहेत. विरोधी काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. मगो पक्षाकडे एक आमदार आहे. मगोपने भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. मांद्रे, शिरोडा, म्हापसा या तीन मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत व येत्या 19 रोजी पणजीसाठी पोटनिवडणूक होत आहे.
चारही मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल येत्या 23 रोजी लागेल, त्यावेळी चारही जागा भाजपने जिंकल्या तर आघाडीचे संख्याबळ चोवीस होईल. दोन जागा जिंकल्या तर बावीस होईल. मात्र बावीस हे देखील काठावरील संख्याबळ आहे. गोव्यात जर चारही जागा भाजप जिंकला पण केंद्रात एनडीएचे सरकार पुन्हा येऊ शकले नाही तर मात्र गोव्यात सरकारची स्थिरता धोक्यात आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करील. काँग्रेसकडे चौदा आमदार असले तरी, मगोप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष प्रसाद गावकर असे जमेस धरल्यास विरोधकांचे संख्याबळ सतरा होईल. जर चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या किंवा त्या तीन जागांपैकी एक जागा मगोपने जिंकली तर विरोधकांचे संख्याबळ वीस होणार आहे. अशा स्थितीत गोव्यात सरकार स्थिर ठेवणे हे मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी मोठे अग्नीदिव्य ठरेल. अर्थात या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत पण राज्यातील बहुतेक मंत्री व आमदार 23 रोजी काय घडेल यावर लक्ष ठेवून आहेत. सर्वानाच सरकारची सध्याची स्थिती ठाऊक आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र गोवा सरकार उरलेला तीन वर्षाचा कार्यकाळ निश्चितच पूर्ण करील असा विश्वास व्यक्त केला आहे.