म्हापसा : शिमला येथील केंद्रीय कारागृहातून पसार झालेला तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी दर्शन कुमार (४६) याला कळंगुट येथे शनिवारी (18 नोव्हेंबर)अटक करण्यात आली. शिमला पोलिसांकडून कळंगुट पोलिसांना उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दर्शन कुमार हा कानडा-शिमला येथील कारागृहात 12 नोव्हेंबरला तेथील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला. २०१२ साली त्याने केलेल्या खून तसेच चोरी प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला कानडा येथील कारागृहात ठेवण्यात आले होते.
येथील कारागृहात त्याच्यावर बेकरीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेथूनच तो पसार झालेला. या प्रकरणात याच्या विरोधात शिमलातील सरदार पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आलेली. सदर आरोपी कळंगुट भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. ब-याच श्रमानंतर त्याला कळंगुट येथील मासळी मार्केटात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी गोव्यातून पळून जाण्याच्या मार्गावर होता. पळून गेला असता तर त्याला ताब्यात घेणे कठीण झाले असते. शिमलातील सरदार पोलीस स्थानकात आरोपीला पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली आहे.