पणजी : राज्यातील खासगी बसगाडय़ा भाडेपट्टीवर घेण्याची सरकारची सूचना बहुतेक बस व्यवसायिकांना मान्य नाही. सरकार फक्त हवा तयार करत आहे अशी बस मालकांची भावना बनली आहे. कर्ज घेताना बँकांसोबत खासगी बसगाडय़ा व्यवसायिकांचा करार झालेला असल्याने सरकारकडे आणखी वेगळा करार आम्ही करू शकत नाही असे बस मालकांचे म्हणणे आहे.
वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गेल्या आठवडय़ात दोन बैठका घेतल्या होत्या. वास्को व पर्वरीत झालेल्या बैठकीवेळी खासगी बसेस सरकार कदंब महामंडळामार्फत चालविण्यास तयार आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी त्या बैठकांमध्ये बस व्यवसायिकांना सांगितले होते. बस मालक संघटनेचे काही पदाधिकारी त्या बैठकीत सहभागी झाले होते. कदंब वाहतूक महामंडळ व वाहतूक खात्याचेही अधिकारी उपस्थित होते. कदंब महामंडळ खासगी बस मालकांच्या बसेस घेईल व भाडय़ाने चालवेल व दर महिन्याला बस मालकांना काय ते भाडे देईल, असे मंत्री गुदिन्हो यांचे म्हणणो होते. गोव्यातील बस मालकांनी सरकारच्या या प्रस्तावाविषयी चर्चा केली. मात्र हे शक्य नाही असे बस मालकांचे म्हणणो आहे.
बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर सोमवारी लोकमतशी बोलताना म्हणाले, की बस मालकांनी बँकांशी करार केले, अनेककडे सह्या केल्या व मग कर्ज मिळाले. कर्जावरच अनेक बसगाडय़ा चालतात. अशास्थितीत सरकारशी भाडेपट्टीचा करार करणो हे कायद्यात बसणारे नाहीत. अनेक कायदेशीर गुंतागुंत त्यात आहे. सरकार उगाच हवा तयार करतेय. जे सरकार 2017 सालापासून बस मालकांना सरकारी अनुदान योजनेंतर्गत एकही पैसा देऊ शकलेले नाही ते सरकार बस मालकांना दर महिन्याला भाडय़ाचे पुरेसे पैसे देणार हा आजच्या काळात मोठा विनोदच वाटतो. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना बसमालकांना दोन- अडिच लाख रुपये मिळाले होते. मनोहर र्पीकर व आता प्रमोद सावंत यांच्या काळात काहीच मिळाले नाही. त्यामुळे खासगी बसगाडय़ा भाडय़ाने घेणो ह्या सरकारच्या नुसत्या हवेतल्या बाताच वाटतात.
150 बसेस रस्त्यावरदरम्यान, प्रवाशांची संख्या आता वाढत आहे. सरकारने सध्याच्या स्थितीत बस मालक अडचणीत आहेत व आपण त्यावर उपाय काढायला हवा असा विचारच केला नाही. आम्ही पुढाकार घेतला व त्यामुळे खासगी बसगाडय़ा रस्त्यावर आल्या. आता लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला व लोक बसमधून प्रवास करू लागले आहेत. यापुढे ही संख्या वाढेल. सध्या प्रत्येक मार्गावर तीन ते चार बसेस धावतात. यापुढे आणखी धावतील. दीडशे ते एकशे सत्तर बसगाडय़ा सोमवारपासून रस्त्यावर धावण्यास आरंभ झाला, असे ताम्हणकर यांनी सांगितले. स्थलांतरित मजुरांनी गोवा सोडल्यामुळे प्रवाशांची संख्या घटली आहेच. तो मोठा परिणाम आहेच पण एकदा शैक्षणिक वर्ष सुरू झाले की विद्यार्थी व सरकारी कर्मचारीही प्रवासी म्हणून बसेसना लाभतील असे ताम्हणकर म्हणाले.