लोकमत न्युजनेटवर्क
मडगाव: गोव्यातील कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंग याला न्यायालयाने आज शुक्रवारी तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्या शिवाय त्याला दहा हजारांचा दंडही सुनावला आहे. तो न भरल्यास आरोपीला तीन महिन्यांची अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष पुजा कवळेकर यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. सरकारपक्षातर्फे वकील उत्कर्ष आवडे यांनी न्यायालयात युक्तीवाद केले. आराेपीच्या शिक्षेवर युक्तीवाद करताना त्यांनी त्याला कडक शिक्षा ठोठावी अशी मागणी केली होती. या खटल्यात एकूण ९ साक्षिदार तपासण्यात आले. यात एका पिडिताचा समावेश होता. आरोपी हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील आहे.
३१ जुलै २०२० साली कोलवा येथील सुमद्र किनाऱ्याजवळील वाहन पार्किंगच्या जागी कोलवा पोलिसांनी छापा टाकून विजय सिंगला अटक करताना दोन युवतींची सुटका केली होती. या युवतींना वेश्याव्यवसायांसाठी त्याने कोलव्यात आणले होते असे पोलिस तपासात आढळून आले होते.
कोलवा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी या प्रकरणाचे तपासकाम करुन नतंर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.