- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत रेव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या महिला कार्यकर्तीला पंच सदस्याने केलेल्या कथित मारहाण प्रकरणी चौकशी करावी या मागणीसाठी आरजी ने पाटो पणजी येथील पंचायत खात्या समोर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेऊन पंचायत खात्याने संबंधीत घटनेची गट विकास अधिकारी (बीडीओ) चौकशी करुन सात दिवसांत अहवाल सादर करतील असे परिपत्रक जारी केले. त्यानंतर आरजी ने आंदोलन स्थगित केले.
आरजी नेता अजय खोलकर म्हणाले, की शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत झालेला प्रकार निषेधार्त आहे. आरजीच्या महिला कार्यकर्तीला पंच सदस्याने केलेली मारहाण म्हणजे निव्वळ गुंडागिरी आहे. या संपूर्ण प्रकरणाची पंचायत खात्याने बीडिओ मार्फत चौकशी करणे, पंचायत सचिवांकडून त्याबाबतचा अहवाल घेणे तसेच पंचायत कायद्याचे ग्रामसभेवेळी पंचांकडून जर उल्लंघन झाले असेल तर त्याचीही माहिती घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.