वासुदेव पागी
पणजीः मंगळवारी जोरदार पावसाने राज्याला झोडपून काढले. अवघ्या 6 तासात 4 इंच एवढा पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पूरसदृष्य स्थिती राहिली. सोमवारी रात्रभर पावसाची रिमझीम सुरूच होती, परंतु मंगळवारी सकाळी 9.30 नंतर सुरू झालेला पाऊस उसंत न घेता पडला. 11 ते 12.30 या दरम्यानच्या दीड तासात तर जोरदार कोसळला.
हवामान खात्याच्या जुने गोवा येथील यंत्रणांच्या नोंदीनुसार सकाळी 8.30 ते दुपारी दीड वाजेपर्यंत 4 इंच पाऊस पडला. दक्षीण गोव्यात जरा कमी पाऊस पडला. मुरगाव येथे 6 तासात 3.50 इंच एवढा पाऊस नोंदला गेला आहे. जोरदार पावसामुळे पणजीतील बहुते रस्ते पाण्याखाली गेले होते. दयानंद बांदोडकर रस्ता नेहमीप्रमाणेच काही अवघे क्षेत्रफळ वगळल्यास बुडाला होता. मिरामार येथे रस्त्यालाच नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाबरोबरच जोरदार वारा असल्यामुळे झाडे कोसळण्याचे प्रकारही घडले. झाडे रस्त्यावर पडून वाहतूक खोळंबण्याची माहिती देणारे फोन अग्नीशामक दलाला अनेक आले होते.