वासुदेव पागी पणजी : भारतात एरव्ही सर्वाधिक पाऊस मेघालयात पडत असला, तरी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस गोव्यात १४८ इंच इतका पडला आहे. दादरा-नगर हवेलीत १३२ इंच, तर मेघालयात ८३ इंच पाऊस पडला आहे.
दादरा नगर हवेलीत आतापर्यंत पडलेला पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा ६९ टक्के अधिक आहे. ८४ इंच पावसासह केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेघालयात ८३ इंच पाऊस नोंद झाला आहे. सामान्य प्रमाणापेक्षा तो १९ टक्के कमी आहे. त्यामुळे मेघालय तूर्त चौथ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांत व दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात सामान्य प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडला, तर हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मेघालय व नागालँडमध्ये सामान्य प्रमाणापेक्षा खूप कमी पाऊस पडला. मणिपुरात मोठ्या प्रमाणात म्हणजे ९१ टक्के पावसाची कमतरता राहिल्यामुळे हा भाग हवामान खात्याच्या नकाशात पिवळ्या रंगाने दाखविण्यात आला आहे. इतर राज्यांत पाऊस आतापर्यंत सामान्य राहिला आहे.
नैर्ऋत्य मान्सूनने केरळ किनारपट्टीला उशिरा धडक दिल्यामुळे गोव्यातही मान्सून १३ दिवस उशिरा दाखल झाला; परंतु पाऊस मात्र तुफान बरसला. गोव्यात मान्सून २१ जून रोजी दाखल झाला होता; परंतु जूनचे अखेरचे पूर्ण दहा दिवस भरभरून पाऊस पडला. जून महिन्यात ३० इंच पाऊस पडला. जुलै महिन्यात सर्व दिवस पाऊस पडला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, या महिन्यात ५२ इंच पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात विक्रमी ४५ इंच, तर सप्टेंबर महिन्यात सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या १२ दिवसांत २१ इंच पाऊस पडला.गोव्याच्या सरासरी ११७ इंच पावसाचे लक्ष्य यंदा दीड महिना अगोदरच म्हणजे १५ आॅगस्ट रोजी पार झाले. समुद्रकिनारी भागापेक्षा पूर्वेकडील डोंगराळ भागात अधिक पाऊस पडला. सांगे, केपे व सत्तरी या तालुक्यांत जोरदार पाऊस पडला. सत्तरी तालुक्यात तर पाऊस २०० इंचांच्या उंबरठ्यावर आहे. एक-दोन दिवसांत सरासरी पावसाचे इंचांचे दीड शतकही पार होण्याचे संकेत आहेत.