सुशांत कुंकळयेकर
मडगाव: थॉमस कूक ही ब्रिटीश पर्यटन कंपनी बंद पडल्याने गोव्यात येणारा ब्रिटीश पर्यटक यावेळी ब:याच प्रमाणात कमी होणार असल्याने यंदाच्या पर्यटन हंगामात गोव्यात जास्तीत जास्त रशियन पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच गोव्यात रशियाहून 218 पर्यटकांना घेऊन आलेले चार्टर विमान दाखल झाले असून गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांची यंदा संपूर्ण मदार या रशियन पर्यटकांवरच रहाणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रशियात पडत असलेल्या कडक थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रशियन पर्यटक गरम हवेच्या प्रदेशात येत असतात. त्यामुळे मागची कित्येक वर्षे गोवा हे रशियनांसाठी आवडते पर्यटन क्षेत्र बनले आहे. गोव्यात सरासरी दरवर्षी सात ते आठ लाख विदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यात रशियनांची संख्या सर्वात जास्त असते. त्यांच्या पाठोपाठ ब्रिटीश पर्यटकांचा नंबर लागतो. मात्र यंदा थॉमस कूक कंपनीने गोव्यात केलेले बुकींग्स रद्द केल्याने गोवा यंदा सुमारे लाखभर पर्यटकांना यावेळी मुकणार. अशा परिस्थितीत रशिया, युक्रेन येथील पर्यटकांकडे पर्याय म्हणून गोव्यातील व्यावसायिक पाहू लागले आहेत.
ऑक्टोबरच्या मध्यापासून रशियातून दर आठवडय़ाला किमान 9 चार्टर विमाने गोव्यात दाखल होण्याची अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. सध्या रशियात थंडीचा मौसम सुरु झाल्याने ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान ब:याच मोठय़ा प्रमाणावर रशियन पर्यटक गोव्यात दाखल होतील अशी आमची अपेक्षा असल्याचे केपर ट्रॅव्हलचे गोव्याचे प्रमुख अमर धुमटकर यांनी सांगितले. दरवर्षी गोव्यात सरासरी दीड लाख रशियन पर्यटक भेट देत असतात. यंदा भारत सरकारने व्हिसाची रक्कम चार पटीने कमी केल्याने या पर्यटक संख्येत भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
अमर धुमटकर यांनी सांगितले की, यापूर्वी प्रति पर्यटकामागे 100 डॉलर्स व्हिसा रक्कम आकारली जात होती. यंदा ही रक्कम 25 डॉलर्सवर आणली आहे. रशियन पर्यटक हा बहुतेकवेळी आपल्या कुटुंबियांसह पर्यटन करणारा असल्याने कपात झालेली व्हिसाची रक्कम त्याच्यासाठी बरीच दिलासादायक ठरणार आहे. त्यामुळे यंदा आम्हाला रशिया, युक्रेन आणि या प्रदेशातील अन्य देशातील पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
गोवा हे जरी रशियनांचे आवडीचे पर्यटन स्थळ असले तरी व्हिएतनाम, थायलंड व श्रीलंका या राज्यात पर्यटनाला जाणो हे गोव्यात येण्यापेक्षा स्वस्त होऊ लागल्याने कित्येक रशियन गोव्यात न येता दुसऱ्या देशात जाऊ लागले आहेत. या परिस्थितीत जास्तीत जास्त पर्यटकांना गोव्याकडे खेचण्यासाठी आम्ही यावेळी बरेच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे यंदा सर्वात पहिले चार्टर विमान आमच्या कंपनीचे येत आहे. गोव्यातील यंदाचा मौसम पुढच्या मे महिन्यापर्यत चालू राहिल्यास त्याचा फायदा गोव्यातील पर्यटनाला होऊ शकेल असे मत धुमटकर यांनी व्यक्त केले.
2013 व 2014 या दोन हंगामात गोव्यात रेकॉर्ड ब्रेक विदेशी पर्यटक आले होते. त्या तुलनेत आता येणारे पर्यटक 30 टक्के कमी असल्याचे पर्यटन व्यावसायिक सांगतात. त्यातच आता थॉमस कूक ही ब्रिटीश पर्यटन कंपनी बंद पडल्याने यंदाच्या हंगामावर त्याचा अधिकच परिणाम होणार आहे. गोव्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक ब्रिटनहून येतात. त्यामुळे आता रशिया, युक्रेन व स्कँडेनियन देशातील पर्यटकांकडे गोवा पर्याय म्हणून पाहू लागला आहे. मात्र ब्रिटीश पर्यटकात होणारी कपात हे इतर विदेशी पर्यटक भरुन काढतीलच याची शाश्र्वती त्यांना नाही.
2018-19 या मौसमात गोव्यात एकूण 813 चार्टर विमाने आली होती त्यातून 2.19 लाख पर्यटक आले होते. त्यात रशियाहून 292 विमानातून 92.3 हजार, ब्रिटनमधून 224 चार्टर्समधून 52.9 हजार तर युक्रेनच्या 227 चार्टरमधून 53.5 हजार पर्यटक आले होते. यंदा गोव्याला केवळ रशियन व युक्रेनियन पर्यटकांवर अवलंबून रहावे लागणार आहे.
रशियन चार्टर पर्यटकांना गोव्यात आणणाऱ्या केपर ट्रॅव्हल कंपनीचे अमर धुमटकर म्हणाले, गोव्यात असलेले लांबच लांब आणि पांढरी शुभ्र वाळू असलेले किनारे रशियन पर्यटकांना भारी आवडतात. त्यामुळेच गोवा हे त्यांचे आवडीचे पर्यटन स्थळ असते. दिवसभर हे पर्यटक समुद्र किना:यावर सुर्य स्नान घेत आपला दिवस सारतात. मात्र रात्रीच्यावेळी काय करावे हा प्रश्र्न त्यांना सतावतो. गोव्यात जर या पर्यटकांना हा पर्याय मिळाला तर स्थिती वेगळी दिसू शकेल असे ते म्हणाले.
थायलंडसारख्या देशात या पर्यटकांना रात्र सारण्यासाठी वॉकिंग स्ट्रीट सारखे पर्याय असतात. 60 बाथची एक बिअर घेऊन तेथे पर्यटक सारी रात्र घालवू शकतात. मात्र गोव्यात रात्र घालवायची असेल तर नाईट क्लब्स किंवा कॅसिनोवर जावे लागते. जेथे प्रवेशासाठीच भरपूर पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे या पर्यटकांना आपली रात्रही समुद्रा भोवतीच घालवावी लागते. त्यामुळेच एक दोनदा गोव्यात आलेला विदेशी पर्यटक पुन्हा गोव्यात येऊ पहात नाही. या पर्यटकाला जर गोव्यात आणायचे असेल तर त्याच्यासाठी या सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे देखील स्पष्ट केले.
गोवा टुअर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष सावियो माथाईस यांनीही धुमटकर यांचेच मत पुढे नेताना, गोव्यात विदेशी पर्यटक यायचा असेल तर त्यांच्यासाठी सुविधा वाढवाव्या लागतील. स्वच्छ समुद्र किनारे आणि सहजपणो फिरता येतील यासारखे रस्ते उपलब्ध असल्याशिवाय विदेशी पर्यटक गोव्यात येणो कठीण. त्यांना परवडेल अशा दरात रहायची सोय आणि कुठल्याही दडपणाशिवाय फिरता येईल अशी वाहतुकीची सोय जोपर्यत उपलब्ध होत नाही तोपर्यत विदेशी पर्यटक गोव्यात येणो कठीण आहे.गोवा सरकारने हे लक्षात ठेवून उपाययोजना हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.