पणजी : गोव्यात सध्या सुट्टी निमित्ताने लाखो पर्यटक वाहने घेऊन येत आहेत. वाहतूक खात्याने स्थानिक व परप्रांतीय वाहन चालक अशा दोन्ही घटकांविरुद्ध कारवाई मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक नियमांचा भंग करून जे वाहने चालवतात, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र दंड ठोठावल्यानंतर वाहन चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करावा अशा प्रकारचा निर्णय वाहतूक अधिकारी व पोलिसांच्या वाहतूक विभागाने घेतल्यानंतर गोंधळ उडाला होता. या गोंधळाची दखल घेऊन वाहतूक खात्याने आता परवाना निलंबनाची कारवाई स्थगित ठेवावी असे ठरवल्याने ब:याच पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.
गोव्यात वाहन अपघात खूप घडत आहेत. रस्ते रुंद झाले तरी, सुसाट वेगाने वाहने हाकली जातात. दुचाकीस्वार तर गर्दीच्या ठिकाणीही वाहनाचा वेग कमी करत नाहीत. वाहतूक खात्याने आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने नियम भंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली. अवघ्या एक-दोन महिन्यांत एकूण सहा हजार वाहन चालकांचे परवाने निलंबित करावेत अशा प्रकारची शिफारस आरटीओ आणि पोलिसांकडून वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांच्याकडे आली. हजारो वाहन चालकांना शासकीय यंत्रणेने दंड ठोठावला. सरकारी तिजोरीत बराच महसूल जमा केला गेला. मात्र त्याचबरोबर काही हजार वाहन चालकांचे परवानेही कारवाई करणा:या यंत्रणोने ताब्यात घेतले. हे परवाने निलंबित करायचे आहेत अशी भूमिका वाहतूक खात्याने घेतली होती. मात्र जे पर्यटक टॅक्सी चालवतात, अशा चालकांना परवान्याशिवाय मग पर्यटकांची वाहतूक करता येत नसल्याने सगळीच गैरसोय होते. शिवाय जे रोज वाहन घेऊन नोकरी किंवा कामाधंद्यानिमित्त जात असतात, त्यांचाही वाहन परवाना निलंबित झाल्याने त्यांच्यासमोरही मोठी अडचण येते. गोव्यातील अनेक चालकांनी काही आमदार व मंत्र्यांसमोर समस्या मांडली. यामुळे सरकारवर दबाव येऊ लागला.
वाहतूक खात्याने या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाची तूर्त अंमलबजावणी करायची नाही असे ठरवले आहे. संचालक देसाई यांनी तसा आदेश जारी केला आहे. एकदा चालकाने दंड भरल्यानंतर पुन्हा त्याचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करणे म्हणजे गुन्हा कम्पाऊण्ड केल्यानंतरही पुन्हा शिक्षा दिल्यासारखे होत असल्याचा मुद्दा वाहतूक खात्याने विचारात घेतला आहे. या मुद्द्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाईल व मग पुढील आदेश जारी केला जाईल आणि पुढील आदेश येण्यापूर्वी कुणाचाही वाहतूक परवाना निलंबित केला जाणार नाही हे वाहतूक खात्याने आता जाहीर करून चालकांना व पर्यटकांनाही दिलासा दिला आहे. अनेक पर्यटकांकडे परराज्यातील वाहन परवाना असला तरी, त्यांचेही लायसन्स गोव्यातील शासकीय यंत्रणोने ताब्यात घेतले होते