म्हापसा - सरकारने जनतेवर विविध कराचे ओझे लादले आहे. लागू केलेल्या करावर वेळीस योग्य निर्णय घेऊन ते कमी करण्यासाठी पावले न उचलल्यास पाच राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवाप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाची गत होणार पक्षाला पराभवाचा सामना करावा लागणार, असा गंभीर इशारा गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी दिला आहे.
म्हापशात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लोबो पत्रकारांशी बोलत होते. वस्तू सेवा करा (जीएसटी) सहित जनतेवर सरकारने विविध कर लागू केले आहेत. लागू केलेले हे कर अपेक्षेपेक्षा जास्त आहे. करामुळे लोकांच्या गरजेच्या विविध वस्तू ब-याच महागलेल्या आहेत. पर्यटनासहित ब-याच व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत.
गोव्यातील पर्यटन व्यवसायाला तर त्याची सर्वात मोठी झळ पोहोचली आहे. पर्यटकांची संख्या किमान ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. परदेशातून येणारे पर्यटक कमी झाले आहेत. मध्यमवर्गीयांना या करा व्यतिरिक्त आयकर जमा करावा लागतो. इतर व्यावसायिक सुद्धा कराच्या दबावाखाली दबलेला आहे. लागू केलेल्या या विविध करांचे परिणाम मागील महिन्यात जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निकाला नंतर दिसून आले. भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
झालेल्या या पराभवानंतर सरकारने विविध वस्तूवरील कर कमी केले. कमी केलेले कर निवडणूकी पूर्व केले असते तर कदाचीत एवढे परिणाम पाच राज्याच्या निवडणुकीतील निकालातून दिसून आले नसते. कमी कलेले कर हव्या त्या प्रमाणावर कमी केले नसल्याने आताही वेळ गेलेली नसून सरकारने या करांवर आताच योग्य विचार केला नाही तर विधानसभेपाठोपाठ लोकसभेच्या निवडणुकीतही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा लोबो यांनी दिला. करामुळे प्रचारही करणे कठीण होणाार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पर्यटकांना देशात आमंत्रित करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात. आलेल्या पर्यटकांवर नंतर मोठ्या प्रमाणावर कर लादले जातात. येणा-या पर्यटकांना व्हिसात सवलत दिली जाते; पण दिलेली सवलत कराच्या रुपात वसूल करुन घेतली जाते. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे ते म्हणाले. जागतिक स्तरावर पर्यटकन व्यवसायावर लागू केलेला कर ४ टक्क्यापेक्षा जास्त नाही; पण गोव्यात कराचे प्रमाण अंदाजीत २८ टक्के आहे. जागतिक दर्जाशी त्याची तुलना करायची असल्यास किमान तो १० टक्क्यांपर्यंत तरी कमी करणे गरजेचे असल्याचे लोबो म्हणाले.