म्हापसा : उत्तर गोव्यातील म्हापसा येथील भरवस्तीत असलेल्या एल कापितान इमारतीधील झी मोबाइल शोरूमच्या शटर्सची पुढील कुलूपे तोडून १७ लाख रुपये किंमतीचे मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. हा चोरीचा प्रकार शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास घडला. या चोरीची तक्रार शोरूमचे मालक सागर दिवे यांनी शनिवार म्हापसा पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी आत शिरून १७ लाख रुपये किंमतीचे आयफोन आणि सॅमसंग कंपनीचे मोबाईल चोरून नेले. शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या शोरूम बंद करण्यात आले. शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा शोरूम उघडण्यात आले असता शोरूमच्या पुढील शटर्सची दोन्ही कुलूपे कुणी तरी तोडलेली दिसली. त्यावर याची माहिती म्हापसा पोलिसांना देताच म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दीपेश शेटकर, योगेश गडकर, रोहन मडगावकर यांनी व इतर पोलीस कॉन्स्टेबलनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी आतील आयफोन व सॅमसंग कंपनीचे मोबाईल्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्या मोबाइल्सची किंमत १७ लाख रुपये आहे. आणखी मोबाइल्स होते परंतु ते त्यांच्या हाती लागू शकले नाहीत.
या इमारतीजवळ सुपक्षा रक्षक असतो; पण तो त्यावेळी कुठे होता हे समजू शकले नाही. चोरी झाल्याची माहिती ठसे तज्ज्ञांना दिली असता त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. भर वस्तीत आणि आजूबाजूच्या ठिकाणी घरे, दुकाने असताना ही चोरी कशी झाली याचा शोध म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपेश शेटकर करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की या चोरीत सहभागी असलेल्या चोरट्यांचा शोध लवकरच लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
म्हापशात सध्या चो-याच्या प्रकारात वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील पंधरवाड्यात सतत तीन दिवस भरदिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यांचा शोध अजून लागला नाही. त्यांच्या शोधात म्हापसा पोलीस आहेत. शोरूममध्ये सीसीटीव्ही लावलेली आहे. त्याची फुटेज पोलिसांना मालकांकडून देण्यात आलेली नाही. ती नंतर दिली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड झालेले आहे. तरी चोर लवकरात लवकर हाती लागतील, अशी आशा म्हापसा पोलिसांनी व्यक्त केली.