- किशोर कुबलपणजी - गोव्याचा पर्यटक हंगाम सुरु झाला असून आज रविवारी २५० पाहुण्यांना घेऊन रशियाचे या हंगामातील पहिले चार्टर विमान पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावर उतरले.
पर्यटकांचे सरकारतर्फे शाही स्वागत करण्यात आले. या महिन्यासाठी टूर ऑपरेटर्सनी रशिया, कझाकस्तान आणि इस्रायल येथून २५ चार्टर स्लॉट आरक्षित केले आहेत, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाय्रांनी दिली. मॉस्को आणि एक्टरिनबर्ग येथून गोव्याला थेट उड्डाणे होतील. एरोफ्लॉटने कंपनीने ही चार्टर विमानसेवा सुरु केली आहे चार्टर विमानांची संख्या वाढू शकते, असे या अधिकाय्राने स्पष्ट केले.
गोव्यात येणाय्रा पर्यटकांमध्ये रशियापाठोपाठ ब्रिटीश पर्यटकांचा क्रमांक लागतो. यूकेमधून नोव्हेंबरमध्ये चार्टर विमाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष निलेश शहा यांनी चार्टर विमाने सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले कि, युरोप-गोवा थेट विमानसेवा सुरु झाल्याने चार्टर विमानांसाठी न थांबता वैयक्तिकपणे या विमानांनी गोव्यात येणाय्रा ब्रिटीश पर्यटकांची संख्याही आता वाढणार आहे.
दरम्यान, मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि चार्टर ऑपरेटर्सना हा हंगाम चांगला जाण्याची अपेक्षा आहे