पणजी : धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. साळावली, आमठाणे व पंचवाडी ही तीन धरणे तुडुंब भरली आहेत. अंजुणे, चापोली व गावणे धरणांमध्येही पाणी भरलेले आहे.
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी यास दुजोरा दिला. कुठेही पाण्याचा विसर्ग करावा लागलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अंजुणे धरण ३८ टक्के, चापोली ६६ टक्के व गावणे धरण ७६ टक्के भरलेले आहे.
गेले दोन ४८ तास अहोरात्र पाऊस कोसळत असल्याने नद्या, नाले तुडुंब भरलेले आहेत. शेजारी महाराष्ट्रातील तिळारी धरणातील पाण्याची पातळी सध्या १0७.२२ मिटर आहे. या धरणाची क्षमता ११३.२0 मिटर आहे. बदामी म्हणाले की, गेल्या दोन दिवसात पावसाने धरण क्षेत्रात तडाखा दिल्याने धरणे तुडुंब भरली परंतु कुठल्याही धरणातून दरवाजे उघडून विसर्ग केलेला नाही.
हवामान वेधशाळेने पावसाच्या बाबतीत आरेंज अॅलर्ट दिला होता. राज्यात सर्वच भागांमध्ये गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. दोन तीन दिवस सलग पाऊस कोसळला तर एरव्ही वाळवंटी नदीला पूर येऊन साखळी, डिचोली बाजारपेठेत पाणी शिरते. गेले दोन दिवस पावसाने हाहा:कार माजविला त्यामुळे वाळवंटीला उधाण आल्यास डिचोलीही जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दोन वर्षांपूर्वी तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने पुरात दोघांचे बळी गेले होते. डिचोली, पेडणे, बार्देस तालुक्यातील गावामध्ये लोकांच्या घरांची हानी झाली होती तसेच केळीच्या बागायती शेती यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली होती. महसूल खात्याने सर्वेक्षण केल्यानंतर ५५३ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे आढळून आले होते.