ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १६: केंद्र सरकारने गोव्यासाठी १५हजार कोटीहून अधिक कामांना मंजूरी दिली असून राष्ट्रीय महामार्ग १७ चे आणि त्यावर येणाऱ्या सहापदरी पुलांचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे चौपदरी करण आणि मोपा ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत सहापदरी रस्त्याचे बांधकाम, या मोठया कामांना मंजुरी मिळाली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की केंद्र सरकारने गोव्यासाठी ज्या प्रकल्पांसाठी आश्वासने दिली होती त्या महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर हे नवी दिल्ली येते सद्या दिल्ली येथे असून त्यांनी फोन करून आपल्याला ही माहिती दिल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ चे ज्या ठिकाणी सहापदरीकरण करणे शक्य आहे त्या ठिकाणी ते केले जाईल. तसेच ज्या ठिकाणी ते शक्य नसेल त्या ठिकाणी ते चौपदरीच ठेवले जातील. मार्गावर लहान मोठे मिळून सहाहून अधिक पूल येणार आहेत. सर्व पुलांचे सहापदरीकरण केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मोपा येथील प्रस्तावित विमानतळाहून महामार्गापर्यंतच्या ८ किलोमीटर मार्गासाठी पायाभरणी ही येत्या दहा डिसेंबरपूर्वी केली जाईल. तसेच या सर्व प्रकल्पांसाठी मिळून १५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी राज्याला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.