पणजी : जगात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला गोवा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात वेगळेच सौंदर्य प्राप्त करत असतो. अनेक महोत्सव आणि उत्सव याच कालावधीत सुरू होतात आणि लाखो पर्यटकांसाठी हे दिमाखदार महोत्सव म्हणजे मोठी पर्वणीच असते. येत्या दि. 15 डिसेंबरपासून सेरेंडिपीटी आर्ट्स फाऊंडेशनतर्फे सेरेंडिपीटी महोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्याविषयीची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
भारतीय संगीत, नृत्य आणि रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे यथार्थ दर्शन घडविण्याचा प्रयत्न सेरेंडिपीटी फेस्टिव्हलद्वारे केला जातो.यावेळी महोत्सवात नव्वदपेक्षा जास्त डायनेमिक प्रकल्प सादर होतील, ज्यात बाराशेपेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असेल असा दावा आयोजकांनी केला आहे. महोत्सवावेळी फोटोग्राफी, पाक कला, हस्तकला आणि दृश्य कलांची प्रदर्शने स्थानिकांसाठी व पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतील. राजधानी पणजीत दि. 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव पार पडेल.
दक्षिण आशियात कला आविष्कार व कला उत्पादनाला अधिक आक्रमकता प्राप्त करून देण्याच्या हेतूने सेरेंडिपीटी महोत्सव आयोजित केला जातो. गोमंतकीयांनी यापूर्वी या महोत्सवाचा लाभ घेतला. डिसेंबर महिन्यात गोव्यात लाखो पर्यटक आलेले असतात. जुनेगोवे येथील सेंट झेवियर फेस्त तसेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक कार्यक्रम नोव्हेंबर- डिसेंबरच्या कालावधीत पार पडत असतात. शिवाय गोव्याच्या किनारपट्टीत इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल (ईडीएम) होत असते. सेरेंडिपीटी महोत्सवाने त्यात भर टाकली आहे.
डिसेंबरमध्येच गोव्यात ख्रिस्ती बांधवांकडून साजरा केला जाणारा नाताळ सण हाही लाखो पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत असतो. नाताळावेळी गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांची घरे आणि कार्यालये रोषणाईने सजलेली असतात. सेरेंडिपीटी महोत्सवानिमित्तानेही पणजी ते रायबंदपर्यंत अनेक इमारती रंगवून त्यावर चित्रे साकारणो यासारखे उपक्रम केले जातात. यावेळचा सेरेंडिपीटी महोत्सव ही आर्ट्स फाऊंडेशनची चौथी आवृत्ती असल्याचे सांगण्यात आले. गोव्याच्या विविधांगी सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन घडविण्यासाठीही सेरेंडिपीटी महोत्सव व्यासपीठ उपलब्ध करून देईल. विवेक मिनेङिास हे खास प्रोजेक्ट क्युरेटर म्हणून काम करतील.