मडगाव - शिवोली येथे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीला गोवा पीडित नुकसान भरपाई योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस बाल न्यायालयाच्या अध्यक्ष वंदना तेंडुलकर यांनी केली. या प्रकरणात अप्पाजी नाईक या ट्रक चालकाला अपहरणाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फर्मावण्यात आली. याशिवाय आरोपीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. मार्च 2016 मध्ये ही घटना घडली होती. संशयिताने एका 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र पुरेशा वैद्यकीय पुराव्याअभावी आरोपीला बलात्काराच्या आरोपातून निर्दोष ठरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तिसरीत शिकणारी एक विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती. बस यायला उशीर झाला होता. दरम्यानच्या काळात आरोपीने या मुलीला जवळच्या देवळात नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या मुलीने केलेला आरडाओरडा ऐकून देवळातला पुजारी तिथे धावत येऊन त्याने त्या मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून तिला घरी नेऊन सोडले. या मुलीने नंतर आपल्या घरच्याना आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले असता, सदर पुजा:याने आपली साक्ष फिरवत ही घटना आपण पाहिल्याचे तसेच त्या मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून तिला तिच्या घरी पोहोचविल्याचे अमान्य केले.
असे जरी असले तरी पीडित ज्यावेळी न्यायालयात आली त्यावेळी तिने आरोपीची ओळख पटवली होती. आरोपीला पाहिल्यावर ती ढसाढसा रडू लागली. हे सर्व पहाता पीडितेच्या आणि तिच्या आईच्या साक्षीवर अविश्वास दाखवण्यासारखी कुठलीही परिस्थिती नसल्याचे न्या. तेंडुलकर यांनी आपल्या आदेशात नमुद केले. एवढेच नव्हे तर त्या शाळेतील असलेल्या असुविधावरही लक्ष वेधले. या शाळेत ज्या मुलांना पालक नेऊ शकत नाहीत अशांना घरी पोहोचवण्यासाठी कुठलीही सोय नाही तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा रक्षक यांचीही सोय नसल्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधले.