पणजी : भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर विविध पक्ष एकत्र आले तरी, कथित महागठबंधनाचा परिणाम हा शून्य आहे. भाजपाच यावेळीही जिंकेल. 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते आमच्याकडे असले तरी, त्यावेळी वाजपेयी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो व त्यामुळे पराभव वाट्याला आला, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी शनिवारी सांगितले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि इतरांच्या उपस्थितीत हुसैन यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने बजावलेली कामगिरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. लोकसभेच्या तीनशे जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. तीन राज्यांमध्ये आमचा थोडक्यात पराभव झाला तरी, लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही जिंकणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लोकसभेच्या 74 जागा जिंकू. 2004 साली भाजपाने राजस्तान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या तीन राज्यांत विधानसभा निवडणुकीवेळी विजय प्राप्त केला होता पण लगेच लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो होतो. त्यावेळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मी देखील होतो. वाजपेयींची लोकप्रियता कमी झाली नव्हती, आम्ही त्यांची कामे लोकांर्पयत पोहचविण्यात कमी पडलो होतो, असे हुसैन म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सभा घेतली. त्या सभेला जे उपस्थित राहिले, तेवढेच राजकीय पक्ष विरोधकांच्या महाआघाडीमध्ये आहेत, बाकीचे सर्व मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीसोबत आहेत. आमच्याकडे मोदींसारखा लिडर आहे तर विरोधी आघाडीकडे डिलर आहे, अशी टीका हुसैन यांनी केली. ज्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा अपुरी राहिली असेच नेते विरोधी आघाडीकडे आहेत. ते भ्रष्टाचारी आहेत. मोदी सरकारच्या काळात हिंदू,ख्रिस्ती, मुस्लिम अशा सर्वांना समान वागणूक मिळाली आहे, असे हुसैन म्हणाले.