प्रसाद म्हांबरे
म्हापसा : गोव्यात विदेशी पर्यटकांना घेऊन चार्टड विमान दाखल झाले, शॅकांची उभारणी झाली असली तरी पर्यटकांचा अभाव असल्याने पर्यटन हंगाम गतीमय होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शॅक व्यवसायिकांनी पर्यटकांच्या आगमनाकडे डोळे लावले असून दिवाळीच्या सुट्टीची ते प्रतिक्षा करु लागले आहेत.
राज्यातील विविध किना-यावर शॅक व्यावसायिकांना शॅकांचे परवाने पर्यटन खात्याकडून वितरीत झाले. त्यानंतर राज्यातील विविध किना-यावर शॅकांसाठी अधिकृत परवानगी मिळालेल्या ३६५ शॅक व्यवसायिकातल्या जास्त प्रमाणावर व्यवसायिकांनी शॅकांची उभारणी करण्याचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले. 1 आॅक्टोबराला रशियन पर्यटकांना घेऊन पहिले चार्टड विमान गोव्यात दाखल झाले. सप्टेंबरचा शेवटी व आॅक्टोबरचे पहिले दोन दिवस सलग सुट्ट्या आल्याने देशी पर्यटक सुद्धा गोव्यात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र पहिले दोन दिवस वगळता त्यानंतर पर्यटकांअभावी किनारी भागातील व्यवसाय मंदावले आहेत. पर्यटक नसल्याने शॅक व्यवसायीक त्यांची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून आले आहे. दिवाळीपर्यंत पर्यटन हंगामा ख-या अर्थाने सुरु होत असल्याने काही व्यवसायिकांनी तर शॅकांची उभारणी सुद्धा केली नसल्याचे दिसून आले. पावसाचाही पडसाद व्यवसायिकांवर झाला आहे. एका शॅक व्यवसायिकाला त्याच्या शॅका समोर दहा डॅक बेड (खाटी) घालण्याची परवानगी देण्यात येते.
पुढील किमान १५ दिवस तरी हीच परिस्थिती असणार असल्याचे मत काही शॅक व्यवसायिकांनी व्यक्त केले आहे. आम्हाला दिवाळीच्या सुट्टीची प्रतिक्षा लागली आहे. दिवाळीनंतर बरेच देशी-विदेशी पर्यटक दाखल होत असतात असे मत व्यवसायिकांनी मांडले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पर्यटन खात्याकडून शॅकांचे वितरण करण्यात आल्याने त्यांच्या व्यसायावर मोठा परिणाम झाला होता. यंदा मात्र वितरण वेळेवर करण्यात आले आहे.
राज्यात काणकोण येथील पाळोळे किनाºया पासून ते पेडणे तालुक्यातील हरमल भागापर्यंतच्या किनाºयावर शॅक घालण्यात येत असले तरी पर्यटक उत्तरेतील कळंगुट, कांदोळी, हणजूण, वागातोर, मोरजी तसेच हरमल येथील भागाला जास्त प्रमाणावर प्राधान्य देतात. दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेत शॅकांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांची वर्दळ सततची सुरुच असते. शॅक व्यवसायीक सुद्धा पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना जाहीर करतात.
शॅक व्यावसायीक मालक संघटनेचे अध्यक्ष कु्रज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार हंगाम सुरु झाला असला तरी व्यवसायिकांना आपले बस्तान बसवण्यासाठी किमान १५ दिवसांची प्रतिक्षा करावी लागते. तसेच आॅक्टोबराच्या दुसºया पंधरवड्या पासून राज्यातील पर्यटकांची संख्या वाढायला सुरुवात होते. तेव्हाच खºया अर्थाने हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीची प्रतिक्षा ही करावीच लागेल.
सध्या पहिले चार्टड विमान गोव्यात दाखल झाले असल्याने त्यातून हंगामाची सुरुवात झाली असल्याचा संदेश विदेशातील पर्यटकांना तसेच संबंधीत व्यवसायिकांना दिला जाणार आहे. त्यानंतर विदेशातून चार्टड विमानातून येणाºया पर्यटकांकडून आरक्षणाला सुरुवात होणार आहे व हळूहळू चार्टड विमानांची संख्या वाढत जाणार असून पहिल्या पंधवरड्यानंतर चार्टड विमाने येण्याच्या प्रमाणात बरीच वाढ होत आल्याची माहिती कार्दोज यांनी दिली.