पणजी : म्हादई पाणीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्यावे अशी मागणी मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री वगैरे म्हादईप्रश्नी गोव्याचे हितरक्षण करण्यात पूर्ण अपयशी ठरले, अशी टीका ढवळीकर यांनी केली.
कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो. मात्र गोव्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, जलसंसाधन मंत्री, मुख्यमंत्री कुणीच दिल्लीत जात नाही. म्हादईप्रश्नी गोव्याच्या मंत्री व मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकार काहीच ऐकून घेत नाही असा याचा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी निदान आता गोव्यातील सर्वपक्षीयांकडून निवेदन तरी लिहून घ्यावे व कडक शब्दांतील निवेदन पंतप्रधानांना पाठवावे, असे ढवळीकर यांनी सूचविले. हा विषय गोव्याच्या हितरक्षणाचा आहे. म्हादईचे परिणाम एवढे गंभीर होतील की, दाबोससह सर्व पाणी पुरवठा योजना बंद पडतील. लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. प्रमोद सावंत सभापती होते तेव्हा त्यांनी म्हादईच्या खोऱ्याला भेट देऊन कर्नाटकच्या प्रयत्नांमुळे गोव्यातील गांजे उसगावची पाणी पुरवठा योजना अडचणीत येईल असे म्हटले होते, आता ते का गप्प आहेत ते कळत नाही. लवादाचा निवाडा अधिसूचित होणो म्हणजे केंद्राने पाणी वळविण्यास कर्नाटकला थेट एनओसी दिल्यासारखा अर्थ होतो, असे ढवळीकर म्हणाले.
सरकारची ढोंगबाजी : सावळ
म्हादईचे पाणी कर्नाटकने काही प्रमाणात वळविल्यामुळे आताच डिचोली नदीचे पाणी कमी झाले आहे व आमठाणो धरणातही पाण्याची पातळी कमी होत असल्याचे माजी आमदार नरेश सावळ यांनी सांगितले. म्हादईप्रश्नी गोवा सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. म्हादई म्हणजे स्वत:ची आई आहे असे सरकारने सांगणो ही निव्वळ ढोंगबाजी आहे, असे सावळ म्हणाले.
म्हादईचे पाणी वळविण्याचे दुष्परिणाम पूर्ण गोव्याला पुढील दहा-पंधरा वर्षात दिसून येतील. येथील निसर्ग, पर्यावरण, जैवसंपदा नष्ट होईल. ज्या हिंटरलँड पर्यटनाच्या गोष्टी सरकार सांगते, ते ग्रामीण भागातील पर्यटनच संपुष्टात येईल, असे मिलिंद पिळगावकर यांनी सांगितले. कुडचिरे, म्हावळींगे सारख्या भागात म्हादईच्या उपनद्यांवर शेती, कुळागरे जगतात. यापुढे तेही नष्ट होईल, असे पिळगावकर म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे ढवळीकर म्हणाले.