पणजी : दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनीकरण करावा, यासाठी रविवारी (दि. ३) दोडामार्ग येथील गणेश मंदिरात बोलविलेल्या जनसभेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या गोव्यातील पत्रकारांना शिवसेनेचे स्थानिक तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांनी धक्काबुक्की केली होती. या कृतीचा गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने (गुज) निषेध केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बातमीचे वार्तांकन करण्यासाठी प्रुडंट मीडिया वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिस्ट चेतन गावस व गोवा ३६५ वाहिनीचे प्रतिनिधी महेश गोवेकर गेले होते. बैठक संपल्यानंतर स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना बाबूराव धुरी यांनी सहका-यांसह हस्तक्षेप केला. या पत्रकारांना धक्काबुक्की करत प्रतिक्रिया घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॅमेरासह पत्रकारांना ढकलून देत ‘या प्रकरणात गोव्याच्या पत्रकारांनी पडू नये,’ अशा शब्दांत त्यांनी दादागिरी केली. हा भ्याड हल्ला आम्ही खपवून घेणार नसून पत्रकारांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. बाबूराव धुरी यांनी तात्काळ या पत्रकारांची माफी मागावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुखांच्या वर्तनाचा निषेध केला असून याबाबत शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राउत यांचे लक्ष वेधले असल्याचे सांगितले.