यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: तालुक्यातील अन्य मुख्य देवस्थानांपैकी फोंडा शहर आणि गाव या मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलेश्वरी येथील कपिलेश्वर देवस्थानची गणना प्रसिद्ध देवस्थानांमध्ये केली जाते. अन्य देवस्थानांबरोबरच अनेक पर्यटक या देवस्थानात दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक देवस्थानाचा एक विशेष उत्सव, सण असतो. यामध्ये कपिलेश्वरी येथील कपिलेश्वर देवस्थानचा नवरात्री उत्सव जत्रा उत्सव, देवस्थानचा वर्धापन नवमी उत्सव व अन्य उत्सव साजरे केले जातात. नवरात्री उत्सवाला प्रत्येक देवस्थानात देवांचे वेगवेगळे आसन असते. मात्र कपिलेश्वरी देवस्थानात देव कपिलेश्वर नऊ दिवस एकाच आसनावर विराजमान असतो. या मंदिराच्या धार्मिक कार्यात वैदिक समाजाचा अनमोल वाटा आहे .
कपिलेश्वरी येथील कपिलेश्वर महारुद्र पंचायतन संस्थान अंतर्गत पाच मंदिरे येतात. यात कपलेश्वरी मंदिर; दुसरे श्री भगवती मंदिर, ढवळी; तिसरे कमळेश्वर देवस्थान, ढवळी; चौथे बेताळ मंदिर, कवळे; तर महादेव रामेश्वर गोविंद मंदिर, आगापूर या पाच देवस्थानांचा समावेश आहे. नवरात्री उत्सवाला प्रत्येक दिवस ठरावीक कुटुंबांना मखर सजावट व देवाची अन्य सेवा करण्याचा मान देण्यात आलेला आहे. पहिल्या दिवशी कपिलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष देवेंद्र देवळीकर यांना देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी ढवळीकर कुळावी मंडळ, तिसऱ्या दिवशी कैलासवासी दत्तात्रय अनंत बखले, चौथ्या दिवशी दुर्गादास ढवळीकर व कुटुंबीय पाचव्या दिवशी रघुनाथ ढवळीकर कुटुंबीय, सहाव्या दिवशी सुदिन ढवळीकर व कुटुंबीय, सातव्या दिवशी कपिलेश्वर ग्रामस्थ, आठव्या दिवशी रामचंद्र भास्कर बखले व गजानन हरी बखले कुटुंबीय यांना देण्यात आला आहे तर नवव्या दिवशी पांडुरंग बखले या कुटुंबाला देवाची सेवा व मखर उत्सवाची जबाबदारी दिली जाते.
कपिलेश्वरी देवस्थानचे भक्तगण संपूर्ण गोव्यात तसेच अन्य राज्यांमध्येही विखुरलेले आहेत. ते जत्रोत्सव तसेच नवरात्री उत्सवात भेट देऊन देवाचा आशीर्वाद घेतात. कपिलेश्वरी देवस्थानचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे कपिलेश्वराची जत्रा व रथोत्सव. जत्रोत्सव मार्गशीर्ष महिन्यात होतो. जत्रेला पहाटे सुवासिनी दिवजोत्सवात सहभागी होऊन देवाच्या चरणी प्रार्थना करतात व आशीर्वाद घेतात. या उत्सवात शेकडो लोक सहभागी होतात. जत्रोत्सवाला पाचही देव एकत्र येतात. रथ, पालखी तसेच देवाची तरंगे एकत्र येऊन उत्साहात साजरा होतो.