ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 7 - गोवा मुक्तीनंतरच्या प्रखर विद्यार्थी चळवळीतील नेते अॅड. सतीश सोनक यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. मानवी हक्कांसाठी झटणारे समाजसेवक अशी ओळख असलेले अॅड. सोनक न्यायालयात प्रतिवाद करत असतानाच त्यांना सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
गोमेकॉ रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे डॉक्टर असणारी आई, प्रसिद्ध चित्रकार असणारी पत्नी हर्षदा केरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणारे भाऊ महेश सोनक, साहित्यिक असणारी बहीण सुषमा सोनक आदी परिवार आहे. सोनक कुटुंब मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील वकीली करण्यासाठी गोव्यात आले होते. वकीलीच्या व्यवसायात त्यांचे मोठे नाव होते. सोनक कुटुंब येथेच स्थायिक झाले. (विशेष प्रतिनिधी)