किशोर कुबल - पणजी - आश्वेवाडा मांद्रे येथील जागेत बेकायदेशीरपणे खादकाम केल्याप्रकरणी दक्षिण भारतीय सुपरस्टार नागार्जुन याला मांद्रे पंचायतीने नोटीस बजावली आहे. मांद्रे पंचायत व संबंधीत सरकारी यंत्रणेकडून परवानगी न घेता सर्व्हे क्रमांक २११/ २ बी या जागेत खाेदकाम व बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नागार्जुन याला ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर जागेची सरपंच यांनी जावून पाहणी केली व काम बंद पाडले.
प्राप्त माहितीनुसार सदर जागा ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार नागार्जुन राव अक्कीनेनी यांच्या नावे आहे. या जागेत त्यांनी नुकतेच बांधकाम करण्याच्या उद्देशाने खोदकाम करण्यास सुरुवात केली. या कामासाठी स्थानिक पंचायत व अन्य संबंधीत सरकारी यंत्रणांची परवानगी आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी या कामासाठी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. सदर कामाची माहिती मांद्रे पंचायतीला समजताच सरपंच ॲड. अमित सावंत यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली व हे बेकायदेशीरपणे सुरु असलेले काम बंद पाडले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांना सुध्दा पर्यटन खात्याने दणका दिला होता. माेरजी येथील व्हिला पर्यटन खाते व सरकारी यंत्रणांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हॉमस्टेसाठी दिल्याप्रकरणी खात्याने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. पर्यटकांना सदर व्हिला हॉमस्टेसाठी देण्यासाठी पर्यटन खात्याकडे नाेंदणी आवश्यक आहे. मात्र युवराज सिंग यांनी हे नियम पाळले नसल्याने आढळून आले आहे.