लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शुक्रवारपासून सुरू होत असून विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधी आमदार सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत येत्या ८ रोजी अर्थसंकल्प मांडतील.
आज, दि. २ ते १० फेब्रुवारीपर्यंत अधिवेशन चालणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. प्रत्यक्ष कामकाज सहा दिवसांचे असेल. शनिवार, रविवारी तसेच मंगळवारी ६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगावातील जाहीर सभेच्या दिवशी कामकाज होणार नाही.
सातही विरोधी आमदारांची बैठक गेल्या ८ जानेवारी रोजी अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी झाली होती. प्रश्न विचारण्याची समान संधी न दिल्यास अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला होता. सभापतींनी प्रश्नांबाबत जुनीच पद्धत वापरावी, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून वाढती बेरोजगारी, म्हादई, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, बंद असलेला खाण व्यवसाय, आपत्कालीन यंत्रणांना आलेले अपयश, शेतकऱ्यांना अनुदान, सेल्फ हेल्प ग्रुपची माधान्ह आहाराची थकलेली बिले आदी प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरणार आहेत. म्हादई प्रवाहची एकही बैठक अजून झालेली नाही. कर्नाटकने पाणी वळविणे चालूच ठेवले आहे. खाणी सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
दरम्यान, राज्य सरकारला अर्थसंकल्पात काय तरतुदी असाव्यात याबाबत आपल्या मागण्यांची निवेदने उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल्स तसेच ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या टीटीएजी, रियल इस्टेट व्यावसायिकांच्या 'क्रेडाई' आदींनी दिलेली आहेत. पाच खासगी ठराव कामकाजात येणार असून, शुक्रवार, ९ रोजी त्यावर चर्चा होईल.