किशोर कुबल, पणजी : गोव्यात वादग्रस्त ठरलेल्या तामनार वीज प्रकल्पाला राज्य वन्य प्राणी मंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर १२०० मॅगावॅट वीज गोव्याला मिळणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पर्यावरणास मारक ठरणार असलेले तीन वादग्रस्त प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली जात आहे त्यात तामनार वीज प्रकल्पाचाही समावेश आहे परंतु या प्रकल्पाला राज्य वन्य प्राणी मंडळाने मान्यता दिली आहे.
१४ हजार झाडे कापावी लागणार
मोलें अभयारण्यातून येऊ घातलेल्या ४०० केव्ही वीज वाहिनीमुळे सुमारे १४ हजार झाडे कापावी लागणार असे प्रतिज्ञापत्र खुद्द सरकारनेच हायकोर्टात दिल्याचा दावा करुन विरोधी आमदारांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हंगामा केला होता. पर्यावरण, जंगल, वन्य प्राणी यांचा या प्रकल्पामुळे संहार होईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे. शिवाय कर्नाटकात अजून वीज वाहिन्या कुठे टाकायच्या हे निश्चीत झालेले नाही. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. उद्या कर्नाटकातच जर हा प्रकल्प रद्द झाला तर गोव०याची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया जाईल, त्यामुळे गोव्याने हा प्रकल्पच रद्द करावा, अशी विरोधकांची मागणी होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्य प्राणी मंडळाने या वीज प्रकल्पाला मान्यता दिल्याने सरकार या प्रकल्पावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दरम्यान, अशी माहिती मिळते की, अणशी-दांडेली या व्याघ्र राखीव क्षेत्रातून जाणाऱ्या प्रस्तावित गोवा-तामनार प्रकल्पामुळे कर्नाटकातही तब्बल ६२ हजार झाडांची कत्तल करावी लागणार आहे त्यामुळे कर्नाटकातही आक्षेप आहे. तामनारहून येणारी ४०० केव्ही क्षमतेची ही वीजवाहिनी कर्नाटकात धारवाड येथील नरेंद्र पॅावर ग्रीडपासून सुरू होऊन गोव्यातील शेल्डेपर्यंत येणार आहे.