म्हापसा : म्हापशातील हनुमान मंदिरासमोर असलेल्या शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय म्हापसा पालिकेच्या घेण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने घेण्यात आला. हा प्रस्ताव रोटरी क्लब ऑफ म्हापसाकडून पालिकेला सादर करण्यात आलेला. सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात पुतळ्याचा आराखडा देण्यात आला नसल्याने तो आराखडा सादर करण्याची विनंती रोटरी क्लबला पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच रोटरी क्लब सोबत संयुक्त बैठक घेऊन त्यावरील पुढील कृती ठरवली जाणार आहे. नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात पुतळ्याची प्रतिमा कांस्याची असणार आहे. त्याची उंची १२ फूटांची असणार असून त्यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यात नमुद करण्यात आले आहे. पुतळ्याच्या उभारणीला पालिकेची मंजुरी आवश्यक असल्याने हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला. मंजुरीनंतर पुढील कामाला गती देण्यात येणार आहे. या प्रस्तावा सोबत पुतळ्यासमोर असलेल्या हुतात्मा स्मारकापासून ते गांधी चौकापर्यंत सौंदर्यीकरण करण्या संबंधीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला त्यालाही बैठकीत मान्यता देण्यात आली.
नगराध्यक्ष ब्रागांझा यांनी चर्चेसाठी मांडलेल्या प्रस्तावावर अपले विचार व्यक्त करताना नगरसेवक संदीप फळारी यांनी स्वागत केले. सध्या असलेला महाराजांचा अर्धपुतळा म्हापसा उत्कर्ष मंडळाच्या वतीने बसवण्यात आला होता अशी माहिती दिली. तसेच पुतळ्यावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तसेच त्यावरील वाद टाळण्यासाठी रोटरी क्लबला आराखडा सादर करण्याची विनंती असे सुचित केले. तसेच त्यानंतर त्यांच्या सोबत चर्चा करुन निर्णय घेण्याची विनंती केली. इतर नगरसेवकांनी सुद्धा या चर्चेत भाग घेवून विविध सूचना यावेळी मांडल्या. सदर पुतळ्याच्या देखभालीचे काम पालिकेने स्वत:जवळ ठेवावे असेही सूचित करण्यात आले. मांडलेल्या विविध सूचनेनंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
१४ व्या वित्त आयोगाच्या योजनेखाली पालिकेला मंजूर करण्यात आलेल्या १.६८ कोटी रुपयातून पालिका क्षेत्रात हाती घेण्यात येणा-या विकास कामांवर यावेळी चर्चा करण्यात आली. प्रत्येक नगरसेवकाने स्वताच्या प्रभागा पूरते प्रस्ताव मांडले. त्यावर बोलताना नगराध्यक्षांनी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची प्रभागवार विभागणी करण्यापेक्षा मोठा प्रकल्प घेण्याची सूचना मांडली. मांडण्यात आलेली सूचना नंतर मंजूर करण्यात आली.