पणजी : गोव्याचा जलतरण प्रशिक्षक असलेल्या सुरजित गांगुली या मूळच्या बंगालच्या प्रशिक्षकावर एका १५ वर्षीय जलतरणपटूने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर केंद्रीय क्रीडा मंत्री कीरेन रिजिजू यांनी सुद्धा रिट्विट केले आहे. अशा जलतरणपटूची तातडीने चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सुरजित गांगुली हे राज्य जलतरण प्रशिक्षक आहेत. ते पेडे-म्हापसा येथे क्रीडा संकुलावर गोव्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देतात. गोवा जलतरण संघटनेने त्यांची ही निवड केली होती. त्यांचा मुलगा शॉन गांगुली हा सुद्धा गोव्याकडून प्रतिनिधीत्व करतो. गेल्या अडीच वर्षांपासून ते गोव्यातच वास्तव्यास आहेत. नुकताच राष्ट्रीय गुजरात येथील ४६ व्या सब ज्युनियर स्पर्धेसाठी गोव्याचा संघ निवडण्यात आला होता. या संघात या मुलीचा समावेश होता. ही मुलगी सुद्धा बंगालचीच आहे. मात्र ती गोव्यात शिकत आहे. सुरजित यांनी आपल्यासोबत अनैतिक कृत्य केले असल्याचे या मुलीचे म्हणणे आहे. तसे छायाचित्र आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या ट्विटची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी दखल घेतली असून क्रीडा क्षेत्रातील असा प्रकार निंदनीय असून पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे.
विनोद कापरी आणि रुक्षामी कुमारी यांनी हा व्हिडिओ टॅग केला असून त्यावर रिजिजू यांनी रिट्विट केले आहे. पीएमओ हॅण्डललाही ही पोस्ट टॅग करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेकांच्या प्रतिक्रिया झळकत आहे. सोशल मीडियावरील या पोस्टने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे, यासंदर्भात, गोवा जलतरण संघटनेचे सचिव अब्दुल शेख म्हणाले की, आमच्यापर्यंत कोणतीही तक्रार आली नाही. मात्र केंद्रीय मंत्रालयातून आमच्याकडे विचारणा झाली आहे. आम्ही कालच गांगुली यांना कामावरुन बडतर्फ केले असून पुढील निकालानंतरच आम्ही त्यांना सेवेत घेणार आहोत. अशी घटना घडली असेल तर ते खरच निंदनीय आहे.