पणजी : गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांचा संप शनिवारी सलग दुस-या दिवशीही सुरूच राहिला. पर्यटकांची यामुळे मोठी गैरसोय सुरू आहे. संपाची धग सरकारलाही जाणवू लागली आहे. संप कसा हाताळावा याविषयी सरकारही गोंधळात असल्यासारखी स्थिती आहे. हजारो पर्यटक टॅक्सी व्यावसायिक संपावर गेले आहेत. सरकार लावू पाहत असलेला डिजिटल मीटर आणि स्पीड गव्हर्नर याला टॅक्सी व्यावसायिकांचा विरोध आहे. स्पीड गव्हर्नरमुळे टॅक्सी व्यावसायिकांना 80 स्पीडपेक्षा जास्त गतीने वाहन हाकताच येणार नाही, असे टॅक्सी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सरकारने कदंब वाहतूक महामंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बसगाड्यांची व खासगी कारगाड्यांची व्यवस्था पर्यटकांच्या वाहतुकीसाठी केली आहे पण ती पुरेशी नाही. जगभरातून हजारो पर्यटक रोज दाबोळी विमानतळावर येतात. त्यांची आता गैरसोय होऊ लागली आहे. शुक्रवारी टॅक्सी व्यावसायिकांच्या संपाचा पहिला दिवस होता. त्यामुळे पहिल्या दिवशी उत्साहाने सरकार संपाला सामोरे गेले. संप मोडून काढण्याचीही भाषा केली गेली. दुस-या दिवशी टॅक्सी व्यावसायिक संप सुरू ठेवणार नाही असे सरकारला वाटले होते पण सरकारमधीलच काही मंत्री व आमदारांनी स्वतंत्रपणे टॅक्सी व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्यामुळे टॅक्सी व्यावसायिकांचा उत्साह वाढला. सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला पण त्याला न जुमानता दुस-या दिवशीही टॅक्सी व्यावसायिकांनी संप सुरू ठेवला. यामुळे दाबोळी विमानतळावर आणि अन्यत्र पर्यटक अडकून राहिले आहेत. त्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
वाहतूक संचालक निखील देसाई यांच्या मते दाबोळी विमानतळावर कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या आहेत. त्या बसद्वारे शुक्रवारी 2 हजार 20 पर्यटकांची व अन्य प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. एकूण 64 फे-या कदंबच्या गाड्यांमधून मारल्या गेल्या. आता विमानतळावर कदंबच्या दहा बसगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी टॅक्सी व्यावसायिकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते पण ते ऐकले नाहीत. कायदा भंग करणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री ढवळीकर व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. स्पीड गवर्नर हे लाववेच लागतील. कारण केंद्र सरकारचा तसा कायदा आहे. गोवा सरकार त्याविषयी काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो आहे. टॅक्सी व्यावसायिक ऐकत नसतील तर ओला व उबेरसारख्या कंपन्यांना गोव्यात पर्यटक वाहतुकीसाठी बोलवावे लागेल, असा इशारा मंत्री ढवळीकर यांनी दिला आहे. शनिवारीही पणजीतील आझाद मैदानावर हजारो टॅक्सी व्यवसायिक जमले असून ते सरकारचा निषेध करत आहेत.