ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - बुधवारी धगधगत्या उन्हामुळे पारा ३६.५ अंश सेल्सीएस एवढा विक्रम प्रस्थापीत करण्यापर्यंत चढला. मागील चार वर्षांतील हा सर्वात कडक तापदायक फेब्रुवारी ठरला आहे एवढेच नव्हे तर दुर्मिळ योगायोग जुळून येताना २०१३ साली हा विक्रम नोंदला गेला तो दिवसही १५ फेब्रुवारीच होता आणि आताही १५ फेब्रुवारीलाच त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
वसंतात ग्रीष्म प्रकटावा अशी परिस्थिती बुधवारी निर्माण झाली होती. कमाल तापमान खुद्द हवामान खात्याचेच अंदाज चुकवून पुढे गेले आणि ३६.५ अंश सेल्सीएसपर्यंत तापले. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा ४.६ अंश सेल्सीएसने चुकविणारे हे तापमान ठरले. हवामान खात्याने ३२ अंश सेल्सीएसचा अंदाज वर्तविला होता. किमान तापमान २२.१ एवढे होते. आर्द्रता ५९ टक्के एवढी राहिल्यामुळे कोरडी हवा राहिली.
फेब्रुवारी महिन्यात इतके उष्ण हवामान हा चार वर्षांतील विक्रम असून २०१३ साली १५ फेब्रुवारीतच यापूर्वी हा उच्चांक लागला होता. त्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजे २०१२ सालच्या फेब्रुवारीतही ३६.५ अंश सेल्सीएस तापमानाची नोंद झाली होती, परंतु ती २८ तारखेला होती. बुधवारचे तापमान हे जरी ४ वर्षांतील फेब्रुवारीचे विक्रमी तापमान ठरले असले तरी या वर्षातील उच्चांक मात्र ३६.८ अंश सेल्सीएस असा असून २२ जानेवारी २०१७ रोजी ही या तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पणजी केंद्राकडून देण्यात आली.
आतापर्यंतचा सर्वात धगधगता फेब्रुवारी हा ३३ वर्षांपूर्वीचा फेब्रुवारी ठरला असून हा आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे. १९८४ साल हे लीप वर्ष होते आणि या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ रोजी ३८ अंश सेल्सीएस पर्यंत तापमान वाढले होते अशी हवामान खात्याची नोंद आहे. फेब्रुवारी महिन्यातील सर्वात कमी तापमानही ५२ वर्षांपूर्वी महिन्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे २८ फेब्रुवारी १९६५ रोजी १३.३ अंश सेल्सीएस एवढे खाली आले होते.