- नारायण गावसपणजी - पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यावर आता तात्पुरते डांबर घालायला सुरुवात केली आहे. लोकांकडून वारंवार या विरोधात आवाज उठविला जात असल्याने स्मार्ट सिटीने हे काम सुरु केले आहे. खाेदलेल्या खड्ड्यातून मातीचा धुरळ पसरत असल्याने आता डांबर घातले जात आहे. पणजी मार्केट परिसरात सध्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे.
स्मार्ट सिटीने सध्या सर्वत्र मलनिसारण तसेच इतर पाईपलाईन घालण्यासाठी खड्डे मारले आहेत. त्यामुळे या खड्ड्यातून मातीचा धुरळ पसरत असतो. याचा फटका वाहन चालकांना तसेच दुकानदारांना बसतो दुकानावर साहित्य खरेदी होत नाही. तसेच पणजी वाहतूक करणाऱ्या लोकांचे कडपे खराब होत असतात. या खड्ड्यातून गाडी चालविताना दुचाकीवाल्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे वारंवार याच्या तक्रारी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना केल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कामाची पाहणी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली होती. त्यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून आता हे तात्पुरते डांबरीकरण केेले जात आहे.
स्मार्ट सिटीच्या या खड्ड्यात आतापर्यंत अनेक गाड्या रुतल्या आहेत. अनेकजण पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे आता स्मार्ट सिटीने याची गंभीर दखल घेतली आहे. कंत्राटदाराने सर्व बांधकामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच इतर सुचना फलक लावले आहेत. तसेच आता पावसाळ्या पूर्वी ही खाेदलेली कामे पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने हे डांबरीकरणाचे काम सुरु आहे. हे डांबरीकरण झाल्यावर लवकरच रस्ते हॉटमिक्स केलेे जाणार आहे. पण अजून काही दिवस पणजीतील लाेकांना या स्मार्ट सिटीचा त्रास सहन करावा लागणार आहे.