पणजी : पर्रीकर सरकारमधील ज्येष्ठ भाजप मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि कळंगुट मतदारसंघाचे भाजपा आमदार मायकल लोबो यांच्यात गेले काही दिवस जोरदार शाब्दिक युद्ध पेटलेले असल्याने व भाजपाही त्या वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याने आता हा वाद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाच निस्तरावे लागणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे अमेरिकेतील इस्पितळात तीन महिने उपचार घेऊन परतल्यानंतर लगेच त्यांना गोव्यात या वादाचा ताण सहन करावा लागत असल्याने भाजपामधील काही घटकांमध्ये नाराजीची भावना आहे.
पक्षांतर्गत कलह हे नेहमी काँग्रेसमध्येच होत असतात, भाजपामध्ये होत नाहीत किंवा झाले तरी ते कधी चव्हाटय़ावर येत नाहीत, असा पवित्र गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम कायम घेत आली आहे. मात्र आता नगर विकास मंत्री डिसोझा व आमदार तथा गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्यात वाद पेटल्याने भाजपाच्या कोअर टीमलाही मोठी कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंत्री व आमदारामधील या वादात हस्तक्षेप केला आहे. दोघांशीही मुख्यमंत्री स्वतंत्रपणे बोलणार आहेत. मुख्यमंत्र्यांची आमदार लोबो यांच्यासोबत प्राथमिक बोलणी झाली आहेत, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर यांना डॉक्टरांनी जास्त ताण घेऊ नका, असा सल्ला दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली कामाची वेळ त्यामुळे कमी केली आहे. शिवाय ते कोणत्याच सार्वजनिक सोहळ्य़ांमध्येही आता सहभागी होत नाहीत व लोकांच्या गर्दीपासूनही दूर राहतात. मात्र मंत्री डिसोझा व आमदार लोबो यांच्यातील वाद हा अकारण मुख्यमंत्र्यांना तापदायक ठरत असल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. भाजपाचे मंत्री व आमदार जाहीरपणे भांडत असल्याने लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, अशी भाजपमधील जबाबदार पदाधिका-यांची भावना बनली आहे.
लोबो हे दोनवेळा भाजपाच्या तिकीटावर कळंगुटमधून निवडून आले. डिसोझा हे सातत्याने भाजपातर्फे म्हापशातून निवडून येत आहेत. मंत्री डिसोझा हे अकार्यक्षम असून ते म्हापसा मतदारसंघाला न्याय देऊ शकत नाहीत, अशा अर्थाची टीका लोबो यांनी केल्यानंतर वाद सुरू झाला. लोबो यांना मंत्रिपद हवे आहे व त्यासाठी ते असे बोलतात, भाजपाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे मंत्री डिसोझा जाहीरपणे म्हणाले. हा वाद वाढत असतानाच पत्रकारांनी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांना त्याविषयी विचारले असता, हा पक्षांतर्गत मामला आहे व त्यावर मुख्यमंत्री व भाजपाही आठवडाभरात तोडगा काढील असे स्पष्टीकरण तानावडे यांनी दिले. मात्र वाद थांबलेला नाही. आता तर लोबो व डिसोझा यांचे समर्थकही एकमेकांविषयी कटू बोलू लागले आहेत.
मुख्यमंत्री पर्रीकर हे गोवा विधानसभेच्या अधिवेशनानंतर येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा अमेरिकेला पुढील उपचारांसाठी जाणार आहेत. अमेरिकेहून आपण परतल्यानंतर मग सगळ्य़ा विषयांबाबत सविस्तर बोलून काय तो तोडगा काढूया, तोर्पयत संयम ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी आमदार लोबो यांना नुकतेच सांगितले असल्याचे सरकारमधील सूत्रांनी स्पष्ट केले. मंत्री डिसोझा हे मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांत भेटून लोबो यांच्याविषयी बोलणार आहेत.