म्हापसा: दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात २०१७ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी केलेल्या विधानासाठी निवडणूक-संबंधित लाचखोरीची तक्रार म्हापसा कोर्टाने फेटाळली. मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारण्याचे आवाहन करीत, मत झाडू चिन्हाला द्यावे असे केजरीवाल त्यावेळी म्हणाले होते. केजरीवाल यांनी जानेवारी २०१७ मध्येे म्हापसा टॅक्सी स्टॅण्डवर सदर वक्तव्य केले होते.
न्यायालयाने लाचखोरीच्या तक्रारीत केजरीवाल यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण नसल्याचे सांगत ही तक्रार फेटाळली. केजरीवाल यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या वतीने मतदारांना कुठल्याप्रकारचे समाधान दिलेले नाही. त्यामुळे अशाप्रकारे भादंसंच्या कलम १७७ई नुसार कलम १७७बी मधील गुन्ह्याचे घटक तयार केले जात नाहीत.
तत्कालिन निवडणूक अधिकारी गुरुदास देसाई यांनी दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तसेच देसाई यांनी म्हापसा पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार सदर तक्रार म्हापसा जेएमएफसीकडे २ फेब्रुवारी २०१८ रोजी पुढे पाठविली व गुन्हा नोंद करण्यात आला.
तसेच कोर्टाने केजरीवाल यांना समन्स जारी करुन केजरीवाल यांना कोर्टात ५ मे २०१८ रोजी हजर राहण्यास सांगितले. तसेच म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षकांना सीआरपीसीच्या कलम २०२नुसार तक्रारीची चौकशी करण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.