- किशोर कुबल
पणजी : गोव्यात दहावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थी, पालक यांच्यात उत्कंठा असली तरी गोवा बोर्डासमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे तो म्हणजे सीमाभागात काही विद्यालयांमध्ये शेजारी राज्यांमधून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. सध्या हद्दी बंद असल्याने दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या या विद्यार्थ्यांचे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी सध्या विचार विनिमय चालू आहे. दरम्यान, इयत्ता बारावीचे पेपर तपासण्याचे काम उद्या गुरुवार, दि. २३ पासून सुरू होत आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनमुळे बारावीचे तीन पेपर बाकी राहिलेले आहेत. परंतु ज्या विषयांची परीक्षा झालेली आहे, त्या विषयांचे पेपर उद्यापासून तपासण्याचे काम सुरू केले जाईल. त्यासाठी शिक्षकांना बोलावण्यात आलेले आहे. मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच टप्प्याटप्प्याने पेपर तपासणी केली जाईल, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
पर्वरी आणि मडगाव अशा दोन केंद्रांवर पेपर तपासणी केली जाईल. २ एप्रिलपासून सुरु व्हावयाची इयत्ता दहावीची परीक्षा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलावी लागल्याने ही परीक्षा कधी होणार याबाबत उत्कंठा आहे. शेजारी महाराष्ट्रातील आरोंदा, सातार्डा, दोडामार्ग भागातून शेजारी महाराष्ट्रामधून गोव्यातील केरी, हरमल, पेडणे, डिचोलीमधील शाळांमध्ये, तसेच माजाळी भागातून काणकोणमधील विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. दहावीच्या
परीक्षेसाठी अशा विद्यार्थ्यांनीही नोंदणी केलेली आहे. सध्या हद्दी बंद असल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गोव्यात येणे शक्य होणार नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही हा विषय उपस्थित करण्यात आलेला असून अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र केंद्र स्थापन करून व्यवस्था करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे.
दरम्यान गोव्यातील विद्यालयांमध्ये आज पासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही आजपासून रुजू झाले आहेत. एकाचवेळी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असता कामा नये.
शैक्षणिक वर्ष येत्या ३0 रोजी संपत असून, विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणे.तसेच पुढील
शैक्षणिक वर्षाचे नियोजन आदी गोष्टी ते करतील. शिक्षण संचालिका वंदना राव यांनी
काढलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांचे तीन
गट करून सकाळी ८ ते दुपारी १२, सकाळी ८.३0 ते दुपारी १२.३0 आणि सकाळी ९ ते १ अशा कामाच्या वेळा ठरवाव्यात. सर्व सरकारी, अनुदानित शाळाप्रमुखांनी गरजेनुसार
आवश्यक तेवढ्याच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना कामावर बोलवावे. घरातून काम करणारे कर्मचारी फोनवर उपलब्ध असणे आवश्यक आहे.