- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील कामगारांना ७ मे रोजी मतदानाव्दारे सुवर्ण संधी चालून आली आहे. कामगार वर्गाचे कोण हीत लक्षात घेते, कोण अन्याय करते याचा विचार करुनच मतदान करावे असे आवाहन आयटक गोवाचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पणजी येथील आझाद मैदानावरुन कामगारांना केले.
कामगार दिना निमित आयटकने बुधवारी पणजीतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मोठया संख्येने कामगार उपस्थित होते. तत्पूर्वी शहरात कामगारांनी रॅली काढून जाेरदार घोषणाबाजी केली.
फोन्सेका म्हणाले, की महिला कामगारांची संख्या कमी झाली आहे. याला प्रमुख कारण म्हणे पुरुष कामगारांच्या तुलनेत त्यांना कमी पगार दिला जातो. महिला कामगारांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होत आहे.यामुळे महिला कामगारांची संख्या कमी होत आहे. कामगारांच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या विकासाठी जो निधी आवश्यक असतो, त्याची तरतूदही कमी केली जाते. या सर्वाचा परिणाम कामगार वर्गावर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.