- सूरज नाईक पवार मडगाव - दिल्ली येथील एका भामटयाने गोव्यातील मडगाव शहरात एका सोने विक्री आस्थापनाला तब्बल साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याचे एक प्रकरण घडले असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणात संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. शेजान ताज असे संशयिताचे नाव आहे. त्याने दागिने घेतले व दोन धनादेश दिले, मात्र हे धनादेश वटलेच नाही. पोलिसांनी भादंसंच्या ४२० कलमाखाली त्याच्यावर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर पुढील तपास करीत आहेत.
जगनाथ गंगाराम पेडणेकर ज्युवेलर्सचे व्यवस्थापक शैलेश चंद्रकांत माने हे तक्रारदार आहेत. फसवणुकीची वरील घटना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात २ ते ५ तारखेच्या दरम्यान घडली होती. तक्रारदाराच्या मडगाव येथील आस्थापनात ही घटना घडली हाेती.
संशयिताने सोन्याचे एक नेकलेस, दोन बांगडया, एक सोनसाखळी, कर्णफुल व सोन्याचे बारसची ऑर्डर दिली. या दागिन्यांची संपूर्ण किमंत १३ लाख ५० हजार ८०० रुपये इतकी आहे. त्याने दोन धनादेश दिले. दागिने घेउन तो निघून गेला, मात्र त्याने दिलेले धनादेश नंतर वटलेच नाही अशी माहिती पाेलिसांनी दिली.