किशोर कुबल/पणजी : गोव्यात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असून दरवर्षी २५० ते ३०० नव्या रुग्णांची नोंद होत आहे. राज्यातील कर्करोगग्रस्तांना पर्तुझुमेब हे कॅन्सरविरोधी औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल या उपक्रमाचा आरंभ केला. या प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि,‘ पर्तुझुमेब औषध सुरुवातीच्या टप्प्यात दिल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. येत्या ३० तारीखपर्यंत आरोग्य खाते राज्यातील तब्बल १ लाख महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठीच्या चाचण्या पूर्ण करील. रुग्णांना प्राथमिक टप्प्यातच पर्तुझुमेब औषध मिळाल्यास त्याचा फार मोठा फायदा होणार आहे.’
विश्वजित यांनी पुढे अशीही माहिती दिली की,‘ रॉश या स्विस बहुराष्ट्रीय हेल्थकेअर कंपनीच्या सहकार्याने सीएसआर अंतर्गत राज्यातील हिमोफिलियाने ग्रस्त ४८ मुलांवर मोफत उपचार केले जातील. लहान वयातच मुलांमध्ये दोष निर्माण होतात व ते नंतर वाढत जातात. स्नायूच्या दुखण्यांमुळे मुले जर्जर होतात. अशा मुलांना हे उपचार जीवनदायी ठरणार आहेत. महागडे उपचार असल्याने अनेकांना ते घेणे शक्य होत नाही त्यामुळे राज्य सरकारने ही व्यवस्था केली आहे.
एसएमएने ग्रस्त चार मुलांवर दीड ते दोन कोटी खर्चणारचार मुले स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी रूग्ण असून त्यांच्यावर वर्षाकाठी दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून मोफत उपचार करणार आहे. या रुग्णांमध्ये नुकतेच पर्पल फेस्टमध्ये भाग घेऊन चांगली कामगिरी बजावलेल्या झोया हाजी हिचाही समावेश आहे.’
आरोग्य क्षेत्रात ‘रोल मॉडेल’विश्वजित म्हणाले की, ‘ गोवा राज्य आरोग्य क्षेत्रात ‘रोल मॉडेल’ म्हणून चमकत आहे. देशात अन्य कुठल्याही राज्यात नाहीत अशा आरोग्य सुविधा आम्ही लोकांना देत आहोत. ‘रॉश’ या स्विस कंपनीशी समझोता करार केलेला आहे. त्या अनुषंगाने हिमोफिलियाने ग्रस्त मुलांवर मोफत उपचार केले जातील. ही एक क्रांतिकारी संकल्पना असून देशभरात गोवा आदर्श ठरला आहे.’
काय आहे स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी?स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी हा जन्मजात आणि जीवघेणा विकार ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. एक नाविन्यपूर्ण थेरपी आता गोव्यातील रुग्णांचे जीवनमान सुधारेल.हिमोफिलियाच्या उपचारात लक्षणीय प्रगती केली आहे. ग्राउंडब्रेकिंग थेरपीमध्ये 'एमिसिझुमॅब', एक मोनोक्लोनल अँटीबॉडी इंजेक्शन दिले जाते. हे हिमोफिलिक रूग्णांसाठी केवळ सामान्य जीवनच प्रदान करत नाही तर रोगप्रतिबंधक उपचार देखील देते, ज्यामुळे रक्तस्त्राव-संबंधित गुंतागुंत, संधिवात समस्या आणि विकृतीचे धोके कमी होतात.