लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अर्थव्यवस्था, पर्यावरण व प्रशासन आदी सात वेगवेगळ्या वर्गवारीत एका संस्थेने अधिकृत आकडेवारी तपासून दिलेल्या रँकिंगमध्ये गोवा ६२.८ गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आला आहे. देशभरात गोव्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
महाराष्ट्राने ५५.७ गुण प्राप्त करून दुसरे स्थान तर गुजरातने ५१.८ गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे. पायाभूत सुविधांमध्ये वीजपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, इस्पितळे व खाटांची उपलब्धता याबाबत गोवा ६८.४ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांमध्ये पंजाब द्वितीय तर हरयाणा तृतीय स्थानी आहे.
आर्थिक कार्यक्षमतेच्या बाबतीत एकूण घरगुती उत्पन्न व दरडोई जीडीपी, महागाई व थेट विदेशी गुंतवणूक आदी निकष लावले असता गुजरात ६३.२ गुण प्राप्त करून प्रथम स्थानी, सिक्कीम ६२.९ गुण प्राप्त करून द्वितीय स्थानी तर गोवा ६२.८ गुण प्राप्त करून तृतीय स्थानी आला. कर्ज व्यवस्थापनाच्या बाबतीत ओडीशा प्रथम स्थानी, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रशासनाच्या बाबतीत आंध्र प्रदेश प्रथम स्थानी, तेलंगणा दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. पर्यावरणाच्या बाबतीत हवा प्रदूषण, वनक्षेत्र आदी निकष लावले असता हिमाचल प्रदेश प्रथम स्थानी, आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, केवळ पायाभूत सुविधांमध्येच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत गोवा अव्वल ठरावा हे आमचे ध्येय आहे. मी मुख्यमंत्री बनल्यानंतर गेल्या साडेचार वर्षाच्या काळात ई- गव्हर्नन्स, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी तसेच इतर माध्यमांतून सातत्याने सुधारणा आणण्याचे प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधांना तर नेहमीच प्राधान्य दिले. त्याचबरोबर मनुष्यबळ विकास व इतर क्षेत्रांतही सुधारणा आणल्या, प्रसंगी नवे वटहुकूम काढावे लागले. सर्वच काही शंभर टक्के साध्य झाले, असे मी म्हणणार नाही. परंतु, गेल्या चार वर्षाच्या काळात सुरुवातीपासून सरकारने जे प्रयत्न केले, त्याचे फळ आता दिसू लागले आहे.